​सणासुदीच्या काळात अन्नपदार्थ, प्रसाद बनविताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

                                 सणासुदीच्या काळात अन्नपदार्थ, प्रसाद बनविताना

मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

लातूर, दि.15 (जिमाका):  गणेशोत्सव, दसरा आदी सणासुदीच्या काळात विविध मंडळातर्फे भंडारा, प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. यासाठी अन्नपदार्थ, प्रसाद तयार करताना गणेश मंडळे, अन्न व्यावसायिक, उत्पादक यांनी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम 2006 आणि त्यांअतर्गत नियम व नियमन 2011 मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त शि. बा. कोडगिरे यांनी केले आहे.

प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करून प्रतिवर्षी शंभर रुपये भरून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे. प्रसाद तयार करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारे अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकाकडूनच खरेदी करावे. परवाना, नोंदणी असलेल्या केटरर्सकडून प्रसाद बनवून घ्यावा. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी. आवश्यक तेवढ्याच प्रसादाचे उत्पादन करावे, उरलेल्या अन्नपदार्थाची योग्य रीतीने विल्हेवाट लावावी. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा, भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

सर्व स्वीट मार्ट उत्पादक, विक्रेते यांनी सणासुदीच्या काळात स्वच्छ, ताजी मिठाई, मोदक तयार करून विक्री करावी. कच्चामाल हा परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकाकडूनच खरेदी करावा. त्याची पक्की बिले घेवून पेढीमध्ये जतन करून ठेवावे. मिठाईच्या ट्रेसमोर बेस्ट बिफोरचा बोर्ड लावाला.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशान्वये अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्या अध्यक्षतेखाली दुध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना भेसळमुक्त, शुद्ध, ताजे व उत्तम प्रतीचे दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत, यासाठी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या समवेत 18 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यातील 21 दुध डेअरी, खवा व पेढा भट्टी व दुकाने, दुध संकलन केंद्रांच्या तपासण्या करून दुध, खवा आणि पेढ्याचे 32 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. दुध व दुग्धजन्य पदार्थ व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतल्या शिवाय व्यवसाय करू नये अन्यथा संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

लातूर जिल्ह्यातील नागरिकांना दुध व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार अथवा जिल्ह्यात कोठेही दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयास किंवा 1800222365 या  टोल फ्री तक्रार नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त शि. बा. कोडगिरे यांनी केले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा