जिल्ह्यात आजपासून ‘आधारवड पंधरवडा’चे आयोजन
जिल्ह्यात आजपासून ‘आधारवड पंधरवडा’चे आयोजन
लातूर, दि. 18 (जिमाका) : जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्ह्यात 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या काळात ‘आधारवड पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शासकीय यंत्रणांमार्फत विविध कार्यक्रम, शिबिरे, मेळावे आयोजित करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.
लातूर जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक. सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्यामार्फत ‘आधारवड पंधरवाडा’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक मेळावे घेण्यात येणार आहेत. या पंधरवाडामध्ये लातूर शहर महानगरपालिकेने लातूर शहरी भागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांची portal.aadharwad.com या संकेतस्थळावर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी पंधरवाडा काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन अदालत घ्यावी, तसेच त्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ द्यावा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी महानगरपालिका हद्दीत व ग्रामीण भागात आरोग्य शिबीराचे आयोजन करावे, मधुमेह रुग्णांना गोळ्या वाटप करणे, मोतीबिंदु असलेल्या रुग्णांची नेत्रतपासणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने ज्येष्ठ नागरिकांचे समुपदेशन शिबीर आयोजित करावे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने ग्रामपंचायत पातळीवर ज्येष्ठांसाठी विशेष ग्रामसभा घ्याव्यात. तसेच त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, याबाबत सूचना देण्यात आल्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment