राष्ट्रीय लोकअदालतीचे 12 मार्च रोजी आयोजन
राष्ट्रीय लोकअदालतीचे
12 मार्च रोजी आयोजन
लातूर,दि.22,(जिमाका):- जिल्ह्यातील
सर्व न्यायालयामध्ये शनिवार दिनांक 12 मार्च, 2022 रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,
नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार राष्ट्रीय
लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांनी
प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन
अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होवून न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपुर्व
प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा
विधी सेवा प्रिाधकरण अध्यक्षा न्या. सुरेखा कोसमकर यांनी केले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये
दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. सदरचे लोक अदालत आभासी
पध्दतीव्दारे देखील आयोजित करण्यात आले आहे. आपआपसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी
या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन लातूर जिल्ह्यातील न्यायालयात करण्यात आलेले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे,
तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात, भू-संपादन, 138 एन.आय. ॲक्ट, कौटुंबिक प्रकरणे,
बँक वसुली प्रकरणे, कामगार, वीज व पाणी बिल प्रकरणे, महसूल प्रकरणे, ग्राहक तक्रार
प्रकरणे व इतर दिवाणी प्रकरणे शिवाय वादपुर्व प्रकरणांमध्ये बँक वसुली प्रकरणे, वीज
व पाणी बिल प्रकरणे, दूरध्वनी / मोबाईल कंपण्याची प्रकरणे पक्षकारांनी
आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या
सचिव श्रीमती एस.डी. अवसेकर यांनी केले आहे.
ज्या नागरीकांनी आपली प्रकरणे या लोक
अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले
आहे.
000
Comments
Post a Comment