लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर प्रादेशिक परिवहनच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित

 

लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर

प्रादेशिक परिवहनच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित

 

§  उदगीर शहरातील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी  वाहतूक मार्गात बदल

 

 


लातूर दि.28 ( जिमाका ):-  लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर आज प्रादेशिक परिवहनच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. सदरची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणचे गजानन निरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, वाहन निरीक्षक अशोक जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर पुढीलप्रमाणे :- मारुती व्हॅन (25 कि.मी. अथवा दोन तासाकरिता) भाडे रुपये 520/- प्रती कि.मी. रुपये 13 प्रमाणे,  टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश कंपनीने बांधणी केलेली वाहने ( 25 कि.मी. अथवा दोन तासाकरिता) भाडे रुपये 570/- प्रती कि.मी. रुपये 14 प्रमाणे  , टाटा 407 / स्वराज्य माझदा आदींच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने (25 कि.मी. अथवा दोन तासाकरिता) भाडे रुपये 660/- प्रती कि.मी. रुपये 18 प्रमाणे , आयसीयु अथवा वातानुकूलीत वाहने ( 25 कि.मी. अथवा दोन तासाकरिता) भाडे रुपये 1130/- प्रती कि.मी. रुपये 24 प्रमाणे  रुग्णवाहिकेचे नवीन दर निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच जे वाहन  मालक / चालक या भाडेदरापेक्षा जास्त भाडेदर आकारणी करतील, अशा वाहन मालकावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  अंतर्गत पहिला गुन्हा रुपये 5 हजार तर दुसरा गुन्हा 10 हजार आणि तिसरा गुन्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येईल.

सदरचे भाडेदर पत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालकास बंधनकारक राहील. वाहन यांत्रिकदृष्ट्या सक्षम व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी वाहन चालक व मालकाची असेल. वाहनाच्या तांत्रिक दोषाकरिता वाहन चालक व मालक जबाबदार असतील, असेही या बैठकीत चर्चेदरम्यान निश्चित करण्यात आले. सदरचे हे दर 25 किलोमीटर आणि दोन तासाकरिताचे भाडे निश्चित केले आहेत. 

उदगीरची वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी वाहतूक मार्गात बदल

अहमदपूर - नांदेड या रस्त्यावरील जड वाहतूक बीदरला जाणारे जड वाहने दिवसा डॉ. जाकीर हुसेन चौकातून नळेगाव रोड ते रिंग रोडनी मार्गस्थ व्हावेत. लातूर - नळेगाव रोडनी आलेली व बीदरकडे जाणारी जड वाहने दिवसा रिंग रोड ( रेस्ट हाऊस) बीदर रोडला मार्गस्थ व्हावेत. बीदर रोडहून आलेली व नांदेडकडे जाणारी जड वाहने शिवाजी चौक ते देगलूर रोडला मार्गस्थ व्हावेत. बीदरहून आलेली व लातूरला जाणारी जड वाहने बीदर रोड कमान / रिंग रोडमार्गे / लातूर – नळेगाव रोडला मार्गस्थ व्हावेत. बीदरहून आलेली व अहमदपूरकडे जाणारे जड वाहने रिंग रोडमार्फत उड्डाणपूल जाकीर हुसेन चौकातून अहमदपूर रोडला मार्गस्थ व्हावेत.

शहराचा मुख्य रस्ता डॉ. जाकीर हुसेन चौक (उमा टॉकीज) ते शिवाजी चौक हा रस्ता सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अवजड वाहनास बंद राहील.

*****

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा