“मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात संपन्न माणसाचे जीवन समृध्द करण्यासाठी मातृभाषा महत्वाची, मातृभाषेची जोपासना आणि वृध्दी करुया - प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे

 “मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न


माणसाचे जीवन समृध्द करण्यासाठी

मातृभाषा महत्वाची, मातृभाषेची जोपासना आणि वृध्दी करुया

                                             -  प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे  

§  संत ज्ञानोबा, तुकडोबांच्या संत साहित्याचा मौल्यवान वारसा मराठी भाषेला लाभला

§  आपल्या भावना, कल्पना आणि विचार व्यक्त करण्याचे मातृभाषा हे प्रभावी साधन

§  जे ज्ञान मातृभाषेतून प्राप्त होते, त्या ज्ञानाला संस्कृतिचा सुगंध असतो


लातूर दि.27 ( जिमाका ):-  माणसाचे जीवन समृध्द करण्यासाठी मातृभाषा ही खुप महत्वाची गोष्ट आहे. जगभरातल्या भाषा शिका पण अभिव्यक्त होण्यासाठी मातृ भाषेऐवढी सशक्त भाषा कोणतीच नाही. माणसाला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्कानी मिळतात, त्याची जोपासना आणि वृध्दी करणे आपले कर्तव्य आहे, अशी भावना प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी मराठी भाषा गौरव दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.


जिल्हा माहिती कार्यालय, लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते दूरदृष्य प्रणालीव्दारे बोलत होते.  

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.,लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, प्रा. डॉ. सुनिता सांगोले, प्रा. डॉ. अंकुशकुमार चव्हाण, प्रा. डॉ. सुभाष कदम, उपप्राचार्य अनिलकुमार माळी , पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे आदि विविध प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.


पुढे डॉ. पाटणे म्हणाले आपले मन सांस्कृतिक संबंधांनी बांधलेले असते. सुसंस्कृत मानव्य निमार्ण करण्याचे कार्य मराठी साहित्याने केले आहे. ज्ञानोबा, तुकडोबांच्या संत साहित्याचा मौल्यवान वारसा मराठी भाषेला लाभला आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन मराठी भाषा विश्वाशी नाते जोडत आहे, माणसांला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने येतात. या भाषिक आणि सांस्कृतिक सामर्थ्यावर तो प्रगती करतो. आपल्या भावना, कल्पना आणि विचार व्यक्त करण्याचे मातृभाषा हे प्रभावी साधन आहे. भाषा आणि शिक्षणाचा संबंध जिव्हाळ्याचा असतो. जे ज्ञान मातृभाषेतून प्राप्त होते. त्या ज्ञानाला संस्कृतिचा सुगंध असतो, असे गौरवोदगार डॉ. पाटणे यांनी यावेळी काढले.

भाषा ही मानवी जीवनात अत्यंत महत्वाची असून भाषा अस्मिताही माणसांची भावनिक गरज असते. भाषा ही फक्त संवादाचे माध्यम नसते, तर माणसाची अस्मिता असते. त्यामुळे भाषा वाढली पाहिजे, अधिक समृध्द झाली पाहिजे. त्यामुळे 27 फेब्रुवारी हा दिवस कुसमुमाग्रज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आज मराठी भाषा गौरव दिनी हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या दिनाचे महत्व विषद केले.

विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपूर्ण करुन अभिवादन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले, अध्यक्षीय समारोप शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले. तर  सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष कदम यांनी केले, आभार स्नेहा वाघमारे यांनी मानले. 

**** 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा