जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये “ जल जीवन मिशन ” अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना मान्यता

 

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये

जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना मान्यता

 

          लातूर,दि.15(जिमाका):- 15 ऑगस्ट, 2019 रोजी पंतप्रधान यांनी ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे.

           त्यानुसार सन-2024 पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. या अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस स्वयंपाकांसाठी आणि घरगुती वापरासाठी शुध्द व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत उपलब्ध करुन देणे हे उद्दीष्ट आहे. या करीता जल जीवन मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या गावनिहाय पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात बसणाऱ्या अंदाजपत्रकांना मान्यता देण्यासाठी  जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

         त्यानुसार नुकतीच  जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा  पाणी व स्वच्छता समितीची  बैठक संपन्न झाली. या   बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती सह अध्यक्ष अभिनव गोयल, बी.आर. शेलार, कार्यकारी अभियंता तथा ग्रामीण पाणी पुरवठा तथा सदस्य सचिव,

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कार्यकारी अभियंता एस.व्ही. कायंदे, व इतर समिती सदस्य तसेच संबंधित उपविभागाचे उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता उपस्थित होते.

          या  बैठकीमध्ये गावनिहाय  तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान ज्या योजनांचे उद्भव नदी /  नाला काठावर प्रस्तावित अथवा अस्तित्वात आहेत, त्या ठिकाणी शक्य असल्यास उद्भव बळकटीकरण उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले.

          सविस्तर चर्चेनंतर कार्यात्मक नळ जोडणी देणे 29 योजनांचे अंदाजित किंमत                    रु. 1412.12 लक्ष, नळ योजना बळकटीकरण करणे 61 कामाचे अंदाजित किंमत                             रु. 3959.30 लक्ष अशा एकूण 90 योजनांसाठी अंदाजित किंमत रु. 5371.42 लक्ष रक्कमेच्या कामांना मान्यता देण्यात आली. ही कामे लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले.

      तसेच यापूर्वी वेळोवेळी झालेल्या समितीच्या सभेमध्ये 67 योजनांच्या कामांना अंदाजित किंमत रु. 3347.08 लक्ष रक्कमेच्या कामांना मान्यता देण्यात आलेली असून सदर योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.

                                                      0000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु