19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त प्रतिबंधात्मक आदेश

 

19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती

निमित्त प्रतिबंधात्मक आदेश

 

                लातूर,दि.16(जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण / उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकाने निश्चित केल्यानुसार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्रभर मोठया प्रमाणात साजरा केला जातो. कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठया प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा न करता स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत.

         नमूद परिपत्रकाच्या अंमलबजावणीस्तव जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. लातूर यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी साजरा करावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात पूढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

       कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक दिनांक 8 जानेवारी 2022 तसेच दिनांक 31 जानेवारी 2022 अंतर्गत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी  छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) साजरी करत असताना शिवज्योत वाहण्याकरिता 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात येत आहे.

         अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गट / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

         दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठया प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध्‍ करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला / प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.

       छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उद. रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

       कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनवर्सन , आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

          या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृथ्यासाठी कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही असेही आदेशात नमुद केले आहे.

 

                                                          0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा