शहरातील पथविक्रेते व फेरीवाल्यांना परवाना स्मार्टकार्ड देवून महानगरपालिकेने आदर्श पॅटर्न निर्माण केला --- पालकमंत्री अमित देशमुख

 

शहरातील पथविक्रेते व फेरीवाल्यांना परवाना

स्मार्टकार्ड देवून महानगरपालिकेने आदर्श पॅटर्न निर्माण केला

--- पालकमंत्री अमित देशमुख

 


लातूर, ( जिमाका ) 1 :-  राज्यात मुंबई महानगरपालिकेनंतर पथविक्रेते व फेरीवाल्यांना परवाना, स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेवून लातूर महानगरपालिकने आदर्श लातूर पॅटर्न निर्माण केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.


गंजगोलाई भागातील अण्णा भाऊ साठे चौक येथे आयाजित फेरीवाल्यांना परवाना व स्मार्टकार्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा आयुक्त अमन मित्तल, महानगरपालिकेतील पदाधिकार, अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करतांना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, मुंबईनंतर हे धोरण राबवणार शहर या राज्यात लातूर शहर हा एकमेव असणार आहे. सामान्य माणसाशी नाळ जोडण्याचं काम महानगरपालिकेने केले आहे. फेरीवाल्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचे काम महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.तसेच तळागाळातल्या सामान्य माणसाला न्याय व आधार मिळवून देण्याचे काम आपल्या लातूर शहर महानगरपालिकेने केलेलं आहे. पथविक्रेते व फेरीवाले अनेक वर्षापासून वर्षानुवर्ष आपली उपजिवीका भागविण्यासाठी व्यवसाय करत आहेत. 


या अनुषंगाने लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत 2014 मध्ये नगरपथ विक्रेता समिती तयार करण्यात आली. पथ विक्रेता समितीच्या नियंत्रणाखाली शहरातील पथविक्रेते यांचे मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणामध्ये आजतागायत पथ विक्रेते एकूण 2 हजार 971 आढळून आलेले आहेत. त्यापैकी महानगरपालिका कार्यालयात 1 हजार 713 पथ विक्रेते यांनी आपले कागदपत्रे, राशनकार्ड, महाराष्ट्र अधिवासी प्रमाणपत्र, अपंग दाखला, जात प्रमाणपत्र आदी इत्यादी कागदपत्रे दाखल केलेले आहेत. या सर्व पथ विक्रेते यांना क्षेत्रीय कार्यालयामार्फत स्मार्ट ओळखपत्र व व्यवसाय प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पंधरा फेरीवाल्यांना स्मार्ट कार्ड, प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

यावेळी महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, फेरीवाल्यांना स्वत:च्या व्यवसायासाठी स्मार्ट कार्डच वितरण होत आहे. त्यांच्या व्यवसायाला कोणत्याही प्रकारे अडसर होवू नये म्हणून व त्यांना त्यांच्या हक्काचं मिळत आहे, असे सांगून त्यांनी महानगरपालिकेत राबवित असलेल्या विविध विकासात्मक कामांची माहिती विशद केली.

या कार्यक्रमास महानगरपालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, परिसरातील फेरीवाले, नागरिक उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु