मराठवाडा मुक्ती गाथा (भाग 12 )
मराठवाडा मुक्ती गाथा (भाग
12 )
हैद्राबाद मुक्तीच्या दिशेने वाटचाल ; ऑपरेशन पोलोची सुरुवात
निजामशाहीतून मुक्त होण्यासाठी लोकांनी
कंबर कसली,दिवसेंदिवस लढा तीव्र होत होता. कृती समितीनेही हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा
लढा वेगवान करण्यासाठी जनतेला भरगच्च कार्यक्रम दिले होते. 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर,
1947 च्या दरम्यान सर्वत्र झेंडावंदनाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. 2 ऑक्टोबर ते
30 नोव्हेंबर, 1947 पर्यंत सरकारी यंत्रणा बंद पाडण्याचे तंत्र वापरण्यात आले. तसेच
रेल्वेचे रूळ उखडणे, तारा तोडणे, यांसारखे कार्यक्रम हाती घेण्यात आले. संस्थानातील
सर्व जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला. ग्रामीण
भागात लेव्हीबंदी आणि साराबंदीचे कार्यक्रम फार यशस्वी झाले. तसेच संस्थानातील गावे
स्वतंत्र करून तेथे निजामाची सत्ता झुगारून गावाची सत्ता प्रस्थापित करणे. तसेच करोडगिरी
नाकी व पोलिस स्टेशन उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गाचाही समावेश होता.
स्वामीजी 26 जानेवारी ते 17 सप्टेंबर, 1948 पर्यंत
जेलमध्ये होते. 1 डिसेंबर, 1947 ते सप्टेंबर, 1948 पर्यंत त्याचे रूपांतर तीव्र आंदोलनात
झाले . जागोजागी होणारे सशस्त्र लढे आणि नांदेड जिल्ह्यातील उमरी बँक प्रकरण यांत स्वामीजींना
खूप मनस्ताप झाला. परंतु, स्वामीजी सतत कृती समितीच्या पाठीशी राहिले. कार्यकर्त्यांना
त्यांनी प्रोत्साहन दिले. म्हणून या आ आंदोलनातील कार्यकर्ते या अग्निदिव्यातून तावून
- सुलाखून बाहेर पडले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली संस्थानातील सर्व जिल्ह्यांत व्यापक
स्वरूपाचा लढा दिला गेला म्हणून निजामी सत्तेची पाळेमुळे पोखरली गेली व पोलिस ॲक्शनच्या
वेळी निजामी सत्तेला पाच दिवसात शरणागती पत्करावी लागली .
इ.स. 1948 मधील पोलिस ॲक्शन (ऑपरेशन पोलो):-
जैसे थे करारामुळे भारतीय संपराज्य
आणि हैदराबाद संस्थान यांच्यात परस्पर सहकार्याचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होईल,
अशी आशा सर्वांना वाटत होती ; परंतु ती निरर्थक ठरली. करारातील तरतुदींचा गैरवापर करणे,
त्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे, अनेक तरतुदींचा भंग करणे, त्यांचे पालन न करणे
असे उद्योग पंतप्रधान मिर लायक अलीच्या सरकारने सुरू केले. कासीम रझवीने रझाकारांची
संख्या व बळ वाढवून सर्वत्र अत्याचाराचे एक नवीन पर्व सुरू केले होते. संस्थांनातील
नागरिकांवर, स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्यांवर, भारतीय सीमेवरील चौक्यांवर आणि तेथील
खेड्यांवर हल्ले करून रझाकारांनी सर्वत्र विध्वंस व प्रचंड रक्तपात सुरू केला . साऱ्या
अत्याचारांना निजामाची मूक संमती होती.
निजामाकडून झालेला करारभंग रझाकाराने सुरू केलेला
रक्तपात, त्याचे लूटमारीचे सत्र, निजाम फौजेचे उपद्व्याप आणि हैदराबाद संस्थानातील
उग्र होत जाणाऱ्या स्वातंत्र्यलढ्याचे दडपण यामुळे भारताच्या गव्हर्नर जनरलने 31 ऑगस्ट,
1948 रोजी निजामाला एक पत्र पाठवले. त्यात म्हटले होते की, निजामाने थोडेसे धाडस दाखवून
रझाकारी संघटनेवर बंदी घालावी. जनतेच्या मनातील भीती दूर करावी. परंतु निजामाने या
पत्राचे बेजबाबदारपणे उत्तर दिले. त्यामुळे निजामाविरुद्ध बळाचा वापर करणे अपरिहार्य
होते. म्हणून दि. 7 सप्टेंबर, 1948 रोजी भारत सरकारने सैन्य दलाला हैदराबादवर चढाई
करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 13 सप्टेंबर, 1948 रोजी पहाटे 4 वाजता संस्थांनाविरुद्ध
'पोलिस ॲक्शन' ची कारवाई झाली .
प्रत्यक्ष कारवाई :-
13 सप्टेंबर, 1948 रोजी भारतीय
फौजा हैदराबाद संस्थानमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून घुसल्या. हैदराबाद संस्थांनावरील
लढाईची ही योजना 'ऑपरेशन पोलो' या सांकेतिक नावाने ओळखली जाते. भारतीय सेनेच्या सदर्न
कमांडचे प्रमुख जनरल गोडार्ड यांनी ही योजना तयार केली. तथापि, नंतर ते निवृत्त झाले
आणि त्यांच्याजागी लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंग यांची नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
मेजर जनरल जयंत चौधरी, मेजर जनरल डी. एस. ब्रार,मेजर जनरल ए. ए. रुद्र, ब्रिगेडीयर शिवदत्त सिंग आणि एअरव्हाईस मार्शल मुखर्जी
यांनी ही योजना राबवली व पूर्णत्वाला नेली. मुख्य लढाई पहिल्या आर्म्ड डिव्हिजनने सोलापूर
येथे सुरू केली. सोलापूर ते हैदराबाद असा लढाईचा मार्ग होता. या मुख्य लढाईचे नेतृत्व
मेजर जनरल जयंत चौधरी यांनी केले. दुसरी आघाडी विजयवाडा मार्गे होती. तिचे नेतृत्व
मेजर जनरल ए. ए. रुद्र हे करत होते. त्याशिवाय कर्नुल, आदिलाबाद, चाळीसगावमार्गे, औरंगाबादकडून
वाशीम मार्गे, हिंगोलीतून बुलढाणामार्गे, जालन्यातून, सोलापूरमार्गे उस्मानाबाद लातूरकडून,
गदग - रायपूरकडून अशा निरनिराळ्या ठिकाणांहून भारतीय फौजा हैदराबाद संस्थांनात घुसल्या.
13 सप्टेंबरच्या पहाटेपासून भारतीय फौजांनी आत्मविश्वासाने कारवाई सुरू केली. पोलिस
ॲक्शनमुळे जनरल अल इद्रिस यांच्या नेतृत्वाखाली निजामी सैन्याची अक्षरशः वाताहत झाली.
पोलिस ॲक्शनची कार्यवाही 17 सप्टेंबर, 1948 पर्यंत चालू राहिली.
शेवटी 17 सप्टेंबर हा मंगलदिन उगवला.
हैदराबादभोवती असलेल्या निजामी फौजांनी लिंगमपल्लीपर्यंत माघार घेतली होती. भारतीय
सेनाधिकाऱ्यांनी निजामी फौजांचे प्रमुख जनरल अल इद्रिस यांना त्यांनी शरणागती पत्करावी
असा संदेश पाठवला. त्याप्रमाणे 17 सप्टेंबर 1948 रोजी सायंकाळी निजामाने आपली शरणागती
घोषित केली आणि आपल्या फौजांना युद्ध थांबवण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर,
1948 रोजी भारतीय सैन्याने निजामाची राजधानी. हैदराबाद शहरात प्रवेश केला. तेथे मेजर
जनरल - चौधरींनी अधिकृतपणे निजामाचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रिस यांच्याकडून शरणागती
पत्करल्यानंतर सैनिकी कार्यवाही पूर्ण झाली. पोलिस ॲक्शननंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामाची
सांगता झाली. दक्षिण भारतातील निजामी सत्तेचे जुलमी पाश स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली
चाललेल्या आंदोलनाने झुगारून दिले. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा जनतेच्या सामर्थ्यांचा
अभूतपूर्व असामान्य विजय समजला जातो.
17 सप्टेंबर, 1948 रोजी मीर उस्मान
अली याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. म्हणून हा दिवस खऱ्या अर्थाने मराठवाड्याचा
मुक्तीदिन आणि भारतीय संघराज्यात सामिल होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
1998 मध्ये हैद्राबादच्या मुक्तीसंग्रामास 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे जुन्या हैद्राबाद
राज्यात सगळीकडे हे वर्षे मुक्तीसंग्रामाचे सुवर्ण महोत्सवी वर्षे म्हणून साजरे झोल.
आता सन 2022 ते 2023 मध्ये मराठवाडा मुक्ती दिनाचे अमृत महोत्सवी वर्षे म्हणून साजरे
होणार आहे.
युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी,लातूर
Comments
Post a Comment