मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर 2022’ स्पर्धा
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून
‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर 2022’ स्पर्धा
कालावधी 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर
2022
*लातूर,दि.28(जिमाका):-*महाराष्ट्राला
लोककलांची आणि लोकगीतांची समृद्ध परंपरा आहे. निसर्गाशी संवाद साधणारी, श्रमपरिहारासाठी
गायली जाणारी शेतकरी गीते,आदिवासी गीते, कोळीगीते, जात्यावरील ओव्या इ. लोकगीते जशी
आहेत, तशी पोवाड्यासारखे शौर्यगीत, लावणीसारखे शृंगारंगीत यांसारखी लोकगीतेही आहेत.
तसेच भारुडासारखे आध्यात्मिक प्रबोधनपर गीतही आहे. भोंडला-हादगा, मंगळागौर, फुगडी,
झिम्मा यांसारखी गाणी त्यांच्या लय-तालबद्धतेमुळे आताही स्त्रिया गातात. विदर्भ, मराठवाडा,
खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या प्रांतांनुसार स्थानिक लोकगीतेही विपुल प्रमाणात
आढळतात.
लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला
आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'लोकगीतांतून
लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आपले नाव मतदार यादीत नोंदवणे
आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार
कार्ड जोडणे. मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यास नाव वगळणे, विविध घटकांना (दिव्यांग, तृतीयपंथी,
ज्येष्ठ नागरिक) दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, हे विषय केंद्रस्थानी ठेवून गीतरचना
करता येईल. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी
निवडणे; पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर
गीतरचना करून लोकशाहीसंबधी जागृती करता येईल.
पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डे-मुक्त
रस्ते, चांगले शिक्षण, चांगली घरे, अशा अनेक सार्वजनिक सुविधा नागरिकांना विनासायास
प्राप्त होणे, हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे
आणि तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, तात्पुरत्या आमिषांना बळी न पडता
आपल्या परिसराच्या कायमस्वरुती विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी
बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकप्रतिनिधीवर दबाव निर्माण होईल. आणि खऱ्या अर्थाने लोकांनी
लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यांसारख्या विचारांची
गुंफण लोकगीतांतून करता येईल.
स्त्रियांच्या गीतात सासर-माहेरचे उल्लेख
असतात. लोकगीतांमधले माहेर गोड असते, जिथे खायाला
सापडते;
तर सासर द्वाड असते, जे कोंडून मारते. सासर-माहेरच्या जागी लोकशाही-हुकूमशाही यांची
प्रतीकात्मक रचना करायला आणि त्यांचे विशेष सांगायला खूपच वाव आहे. लोकगीतांच्या अंगभूत
लवचीक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचे मानस गुंफणेही सहज शक्य आहे. आणि हे मानस
गुंफताना तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत
कसे व्हावे, हे सांगता येईल. लोकगीतांतील स्त्रीपेक्षा आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची
आहे, निर्णयक्षम आहे; हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही
मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असे
लोकगीतातून आवाहन करता येईल.
चला तर मग 'लोकगीतांमधून लोकशाहीचा जागर करू या...!
स्पर्धेची नियमावली :- सदर
स्पर्धा सर्वासाठी खुली आहे. एकल (Solo) आणि समूह (Group) दोन्ही प्रकारची लोकगीते
पाठवता येतील. स्पर्धेचा अर्ज पुढीलप्रमाणे
भरावा :- १ समूह गीते पाठवताना अर्ज एकाच
स्पर्धकाच्या नावे भरावा. २ लोकशाही, निवडणूक,
मताधिकार, आधार जोडणी या विषयांशी संबंधित लोकगीत गाऊन त्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवावी. गीतासोबत नाच असला तरी चालेल. ३ एका स्पर्धकाने किंवा समूहाने एकच गीत
पाठवावे. ४ आपल्या गीताची ध्वनिचित्रफीत
पाठवताना, ती कमीत-कमी दोन मिनिटांची आणि जास्तीत जास्त पाच मिनिटांची पाठवावी. ५
ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साइज जास्तीत जास्त ५०० MB असावी आणि ती MP4 फॉरमॅटमध्ये असावी. ६ ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडताना, त्यावर व्यक्तीचे किंवा
मंडळाचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला
जाईल.
लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी या विषयावर
लोकगीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच
अर्ज
ग्राह्य धरला जाईल. आपली ध्वनिचित्रफीत https://forms. gle/hRoUEKUEb6bT2x499 या गूगल
अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावी. ज्या स्पर्धकांना ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास
अडचण येईल, त्यानी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर), ९९८७९७५५५३ (तुषार पवार) या व्हॉट्सअॅप
क्रमांकावर सदेश (मेसेज) पाठवून कळवावे. दिनांक २६ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२
या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. लोकगीत बोलीभाषेतले असेल तर
गूगल अर्जावर त्याचा मराठीत अनुवाद करून पाठवावा.
बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल : १ समूह लोकगीत
अ. प्रथम क्रमांक:- २१,०००/- ब. द्वितीय क्रमांक:- ११,०००/- क. तृतीय क्रमांक:- ५,०००/-
ड. उत्तेजनार्थ:- १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे, २ एकल लोकगीत, अ. प्रथम क्रमांक
:- ७,०००/- ब. द्वितीय क्रमांक :- ५,०००/- क. तृतीय क्रमांक :- ३,०००/- ड. उत्तेजनार्थ
:- ५०० रुपयांची एकूण दहा बक्षिसे, एकल लोकगीतासाठी २५ पेक्षा कमी प्रवेशिका आल्यास
त्यांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन न करता समूह गटांतर्गत त्यांचे मूल्यमापन केले जाईल.
लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी या विषयाशी संबंधित साहित्य पाठविणाऱ्या सहभागी
सर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय,
महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. समूहामध्ये जास्तीत जास्त पंधरा
व्यक्तींचा समावेश असावा, त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असल्यास अधिकच्या व्यक्तींना
प्रमाणपत्र दिले जाणार नाही. विजेत्यांना बक्षिसाची रक्कम, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह
देण्यात येईल.
आलेल्या लोकगीतांमधून सर्वोत्तम गीते निवडण्याचा,
तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे
राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची
पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल.स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य
निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित
केले
जाईल. निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी / अधिकारी सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात,
मात्र
त्यांच्या
साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही.
****
Comments
Post a Comment