अभियंता,विकास प्रकल्प उभे करतांना देश उभा करत असतो; अभियंत्यांनो नव नवं तंत्रज्ञान आत्मसात करा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

अभियंता,विकास प्रकल्प उभे करतांना देश उभा करत असतो;

अभियंत्यांनो नव नवं तंत्रज्ञान आत्मसात करा

                                                                           - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

            लातूर,दि.21 (जिमाका):-  कोणत्याही क्षेत्रातील अभियंता विकास प्रकल्प उभे करतांना तो पर्यायाने देश उभा करत असतो. त्यामुळे प्रत्येक अभियंत्याने जगभरात आपापल्या क्षेत्रातील नवनवे तंत्रज्ञान आपलंस करून आपल्या जिल्ह्यात नावीण्यपूर्ण काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.

               नुकताच (मंगळवार दि. 20 रोजी) लातूरमधील 14 विविध शासकीय अभियंता विभागाने पहिल्यांदा एकत्र येऊन अभियंता दिन आयोजित केला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, महावितरणचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे,  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय कौसाडीकर, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल कांबळे, महापारेषण कार्यकारी अभियंता प्रकाश जायभये, महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्थाचे कार्यकारी अभियंता यशवंत लवटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्रीरंग कायंदे, महानगरपालिकेचे शहर अभियंता नवनाथ केंद्रे आदि सर्व अभियंतांची उपस्थिती होती.

              जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, सर्व विभागांना एकत्र येऊन अभियांत्रिकी दिन साजरा केला हे कौतुकास्पद आहे. आपल्या मध्ये सातत्याने बदल होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या - त्या क्षेत्रातील अभियांत्रिकीतील तज्ज्ञ अभियंता यांच्याकडून नॉलेज अपग्रेड करून घेण्यासाठी वेळोवेळी कार्यक्रम घेण्यात यावेत. सकारी नोकरीमध्ये तुमच्या माहितीची नितांत गरज आहे. तुमच्या माहितीचा उपयोग करून नावीन्यपूर्ण प्रकल्प उभे राहावेत, ज्यात कमी उर्जा , किमान मेंटेन्स, कॉस्ट कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

             जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, अभियंता यांनी चांगल्या प्रतीचे कौशल्य आत्मसात करावे. सद्याच्या काळात इंजिनिअरींग या क्षेत्रात खुप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. तसेच यासोबतच इंजिनिअरींग या क्षेत्रात तंत्रज्ञानाचाही वापर मोठ्या प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसून येत आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स सारखे नवीन क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक अपडेट होण्याची गरज आहे.

 अभियंता हा अत्यंत तत्पर असतो, त्याला प्रत्येक गोष्ट माहिती असते, कामाचा झपाटा असावा लागतो असे सांगून उत्तम काम करत रहा असा सल्ला महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी यावेळी दिला.

                  तुम्ही कितीही उत्तम काम केले आणि ते समाजाच्या समोर आले नाही तर त्याचा उपयोग होत नाही. तुम्ही जे नावीन्यपूर्ण काम करता ते समाजापुढे आले पाहिजे यासाठी प्रयत्न करा असा सल्ला महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी दिला.

                सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख म्हणाले की, उत्कृष्ट कार्य करा, ते जनतेसमोर येवू द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले.

                 प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी समाजाच्या विकासाचे स्वप्न पाहतो आणि सत्यात उतरवतो तो म्हणजे अभियंता ही संकल्पना सांगून आपण नविन्याचा ध्यास घेऊन काम करुयात असे आवाहन केले.

               यावेळी जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या 14 विभागातील अभियंत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अभियंते आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

                                                                     






Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु