मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला पुष्प चौथे महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा महाविद्यालयात संपन्न
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त
व्याख्यानमाला पुष्प चौथे
महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा महाविद्यालयात संपन्न
मराठवाडा मुक्ती लढा हा जुलमी निजाम विरुद्ध प्रजा असा होता
- विवेक सौताडेकर
लातूर दि. 23 ( जिमाका) हैद्राबाद संस्थान मुक्त करण्यासाठी दिलेला लढा हा अतिशय निश्चयाने व निग्रहाने लढविला गेलेला स्वातंत्र्यलढा आहे. या लढ्यामध्ये मराठवाड्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. इतर मुस्लिम शासक व निजाम अशी अनुक्रमे ४०६ व २२४ असे एकूण ६३० वर्ष मराठवाडा मुस्लिम सत्ताधिशांच्या गुलामीत होता. मराठवाड्यातील माणूस लढण्यामध्ये अत्यंत चिवट व कर्तबगार आहे.या लढ्यामध्ये विद्यार्थी, युवक, युवती,शेतकरी अशा सर्व स्तरातील लोकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला, बलिदान दिले. या लढ्यामध्ये हिंदूं बरोबरच दलित व मुस्लिमांचाही सहभाग होता. 'इमरोज' दैनिकाचे संपादक शोएबउल्ला खान त्याचा मेहुणा ईस्माईल यांचे बलिदान आपणास विसरता येणार नाही.त्यामुळे
हा
लढा निजाम विरुद्ध प्रजा असा होता. एका अन्यायी, अत्याचारी व जुलमी शासकाच्या विरोधात
जनतेने पुकारलेला भारतातील सर्वात मोठा लढा होता असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक व
साहित्यिक विवेक सौताडेकर यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर द्वारा आयोजित
सात दिवसीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प जिल्हाधिकारी कार्यालय लातूर आणि
महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा यांच्या
संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा
या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.एन. कोलपुके , प्रमुख वक्ते इतिहासाचे अभ्यासक तथा साहित्यिक
विवेक सौताडेकर तसेच याप्रसंगी मंचावर निलंगा उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, निलंगा तहसीलदार
घोळवे हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख
शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव , यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी
सौताडेकर म्हणाले की, हैदराबाद संस्थानात एकूण सात निजाम होऊन गेले. परंतु यापैकी इ.स.१९११ साली
सत्तेवर आलेला सातवा निजाम मीर उस्मान अली हा अत्यंत धूर्त होता. याने १ जून
१९४७ रोजी जाहीरनाम्याद्वारे सूचित केले की,
"नव्याने निर्माण झालेल्या भारत किंवा पाकिस्तान यापैकी कोणत्याही संघराज्यात
आपण सामील होणार नाही तर आपण स्वतंत्र राहणार आहोत " त्याच्या या धोरणाला कासिम रझवीच्या रझाकार' संघटनेची मोठी साथ होती.या
लढ्याची संपूर्ण माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाचा
समावेश शालेय अभ्यासक्रमात झाला पाहिजे असेही ते म्हणाले.
स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय प्रा.डाॅ.बी.एस.गायकवाड यांनी करून दिला. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य एम. एन.
कोलपुके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सपना पांचाळ, कु. सुषमा बेलकुंदे, कु. सौदागर
जास्मीन, कु. ऋतुजा तांबाळे यांनी केले. आभार डॉ.एस.जी.बेंजलवार
यांनी
मानले. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात काम करणारे एम.एम.जाधव, डी.बी.बरमदे,डॉ.हंसराज भोसले महाविद्यालयातील प्राध्यापक
व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment