राज्याच्या असंक्रमित क्षेत्रामध्ये लम्पी रोगाचा* *प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक सूचना जारी* *गोजातीय जनावराचे बाजार, पर राज्यातून ने आण करण्यास प्रतिबंध*

 

राज्याच्या असंक्रमित क्षेत्रामध्ये लम्पी रोगाचा*

*प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक सूचना जारी*

*गोजातीय जनावराचे बाजार, पर राज्यातून ने आण करण्यास प्रतिबंध*

*लातूर ,दि.09(जिमाका):-* लम्पी चर्मरोग असल्याचे संशयीत असलेल्या किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या  प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने  राज्याच्या असंक्रमित क्षेत्रामध्ये  अनुसूचीत रोगाच्या प्रसार होण्यास  प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी  आणि कार्यवाही करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना दिलेली आहे.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय यांनी दि. १८ ऑगस्ट, २०२२ रोजी बैठक बोलावली होती आणि त्यांच्या  बैठकीच्या कार्यवृत्तामध्ये अनुसूचित रोग असलेल्या लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी  उपाययोजना करण्याबाबत अवगत केले होते.

गुरे आणि म्हशी मोठ्या प्रमाणात मरण पावणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम,आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. लम्पी चर्म रोगाचा (एलएसडी) प्रादुर्भाव झाल्यामुळे, महाराष्ट्र राज्यामधील १७ जिल्ह्यामधील ५९ तालुक्यामध्ये दि.७ सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राण्यांच्या गोजाती प्रजातींमधील २५ गुरे आणि म्हशी मरण पावल्याचे कळविण्यात आले आहे. लम्पी चर्मरोग (एलएसडी) हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे.

लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत आहेत. म्हणून, आता, लम्पी चर्मरोगाचे (एलएसडी) नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महाराष्ट्र राज्यासाठी अनिवार्य झाले आहे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने या अधिनियमान्वये अनुसूचित रोग असल्याचे घोषित केलेल्या लम्पी चर्मरोगाच्या (एलएसडी) बाबतीत, नियंत्रित क्षेत्र (यात यापुढे ज्याचा निर्देश "नियंत्रित क्षेत्र" असा केला आहे) म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्य घोषित करीत आहे.

लंपी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निमूर्लन करता येईल आणि गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीच्या गुरे आणि म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे,  प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे; आणि नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या लम्पी बाधीत झालेल्या गुरांना आणि म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात आली आहे.

 

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा