माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी व उपचार करुन घ्यावेत - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन

 

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी विशेष मोहिमेचा लाभ घेऊन

आरोग्य तपासणी व उपचार करुन घ्यावेत - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन

§  *जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात येणार*

*लातूर,दि.24 (जिमाका):-*  माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान जिल्ह्यात दि. 26 सप्टेंबर 2022 ते  दि. 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सेवा पुरविण्यात येणार आहे.

              लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी व उपचार करुन घ्यावेत असे, आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एल.एस.देशमुख व जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सतिष हरिदास यांनी केले आहे.

          या मोहिमेमध्ये दररोज सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या कालावधीमध्ये उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रा.आ.केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत माता व महिलांच्या तपासणीची शिबीरे व आजारी महिलांवर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच उपकेंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रस्तरावर समुपदेशन करण्यात येणार असून कार्यक्षेत्रातील गरोदर स्त्रिया, माता व 18 वर्षावरील महिलांची अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी करुन समुपदेशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान नवविवाहीत दांपत्यांची तपासणी करुन गर्भधारणापूर्व काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुटुंब कल्याण कार्यक्रम व 2 अपत्यांमधील अंतराच्या फायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

           सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञांमार्फत 18 वर्षावरील महिलांची तपासणी करुन स्त्रीरोग आजाराच्या माता, महिलाच्या व जोखमीच्या माता यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष सोनोग्रापफी शिबीरांचे आयोजन करुन जास्तीत जास्त गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे.

          राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकांमार्फत शाळा तपासणी झाल्यानंतर गावात भेटी देऊन तपासणी व समुपदेशन करण्यात येणार आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु