मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला सुरु, पहिलं पुष्प दयानंद कला महाविद्यालयात

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला सुरु, पहिलं पुष्प दयानंद कला महाविद्यालयात

स्वांतत्र्यांचे मोल आजच्या पिढीला कळण्यासाठी ही व्याख्यानमाला अत्यंत उपयोगी

                                                                 - प्रा. डॉ. सोमनाथ रोडे

लातूर दि.19(जिमाका):- मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेकांच्या बलिदानातून,त्यागातून आणि समर्पणातून आपल्याला मिळाला आहे. त्याचे मोल या पिढीला कळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही व्याख्यानमाला आयोजित करुन अत्यंत विधायक काम केले असल्याची भावना ज्येष्ठ लेखक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केली.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर व्याख्यानमालचे आयोजन केले आहे. त्या व्याख्यानमालेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या  हस्ते दयानंद कला महाविद्यालयात झाले. त्या व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफतांना डॉ. रोडे बोलत होते.

या वेळी प्रा. डॉ. नागोराव कुंभार, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश महाडिक, जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रशांत मंडणीकर उपस्थित होते.

प्रा.रोडे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, या मुक्ती संग्रामाचे हे 75 वे वर्ष सुरु झाले. हैद्राबाद संस्थानात मराठवाडा, तेलंगण आणि कर्नाटकचा काही भाग होता यात एकूण 16 जिल्हे होते. या सोळा जिल्ह्यात आठ जिल्हे तेलंगणाचे होते, पाच जिल्हे आपल्या मराठवाड्याचे होते आणि तीन जिल्हे कर्नाटकचे होते. भारत स्वतंत्र होत असताना अनेक छोटी मोठी संस्थांन होती. ती देश स्वातंत्र्य झाल्यानंतर संघराज्यामध्ये सामील झाली.

भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या दृष्टीने थोडीशी मागेपुढे भूमिका तीन संस्थांन घेत होते. त्यात जुनागड, काश्मीर आणि हैद्राबाद संस्थांन होती, काही काळांनी जुनागड आणि काश्मीर सामिल झाले, मात्र हैद्राबाद संस्थांन सामिल होत नव्हते. त्यामुळे पालीस ॲक्शनची कारवाई करावी लागल्याची माहिती  यावेळी डॉ. रोडे यांनी दिली. पण या काळात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घालमेल झाली त्याचा आलेखच डॉ. रोडे यांनी यावेळी मांडला. या पिढीने हा इतिहास वाचला पाहिजे, त्यातून त्यांना स्वातंत्र्याचं मोल कळेल. हे आज तुम्ही जे स्वातंत्र्य उपभोगत आहात ते एवढे सहज मिळाले नाही. हे स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, त्यासाठी हा त्याग, बलिदान, समर्पण तुमच्यापुढे मांडणे गरजेचे असल्याची भावनाही डॉ. रोडे यांनी आपल्या व्याख्यानात मांडली.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी  म्हणाले की , मराठवाडा मुक्ती दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष 17 सप्टेंबरपासून सुरू झालेले आहे. त्या अनुषंगाने ही व्याख्यानमाला आम्ही आयोजित केली आहे. आजच्या पिढीला हे सगळे संदर्भ कळायला हवेत, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे ला आपण ध्वजवंदन करतो त्याची माहिती असते पण 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यासाठी खास आहे, त्या मागची पार्श्वभूमी या पिढीला कळावी म्हणून ही व्याख्यानमाला जिल्ह्यातील मोठ्या महाविद्यालयात घेत असल्याचे सांगून हैद्राबाद संस्थान भारतात भौगोलिक दृष्ट्या किती महत्वाचे होते तेही अधोरेखित केले.जिल्हा प्रशासनाच्यावतीने 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामातील दुर्मिक अशा फोटोचे प्रदर्शन भरवून या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात केली आहे. येत्या वर्षभरात अनेक कार्यक्रम घेणार असून जिथे जिथे मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याच्या घटना घडल्या ते ठिकाणे स्मृती स्थळे म्हणून विकसित करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

इंग्लंडमध्ये असे म्हटले जाते की, सद्गुनी मनुष्यबळ तयार झालं की, त्याच्या साह्याने जगावरती साम्राज्य करता येते. तुम्ही युवक आहात तुम्ही शिक्षित बळ आहात हे स्वातंत्र्य तुमच्या कर्तुत्वाशिवाय उजळणार नाही. स्वातंत्र्य म्हणजे काय? ही संकल्पना आपण नीट समजून घेतली पाहिजे. हे मौल्यवान स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची खरी जबाबादारी तुमच्यावर आहे. त्यासाठी हा लढा तुम्हाला समजवून सांगण्याची गरज आहे, ते कौतुकास्पद काम प्रशासन करत असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे प्रा.डॉ. नागोराव कुंभार यांनी आपल्या भाषणात विशद केले.

प्राचार्य शिवाजीराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, या व्याख्यानमालेची पार्श्वभूमी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितली.

उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले. येत्या वर्षभरात जिल्हा प्रशासनाकडून काय काय केलं जाणार आहे हे सांगितले. जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी प्रा.डॉ. सोमनाथ रोडे आणि प्रा. डॉ. नागोराव कुंभार यांचा परिचय करून दिला.

यावेळी प्रा.डॉ. अश्विनी रोडे लिखित "मराठवाडा मुक्ती संग्रामात महाराष्ट्र परिषदेचे योगदान" या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. या व्याख्यानमालेची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. या व्याख्यानमालेचे आभार डॉ. कदम सुभाष यांनी मानले. व्याख्यानमालेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

दुसरे पुष्प राजर्षी शाहू महाविद्यालयात  

            या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प उद्या दि.20 सप्टेंबर, 2022 रोजी राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे सकाळी 11-00 वाजता राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. भुषण जोरगुलवार हे मराठवाडा मुक्ती संग्रामावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचा अधिकाधिक युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 



                                                 ****    

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा