मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात जिल्हा प्रशासनाकडून व्याख्यानमालेने ; जिल्ह्यातील मोठ्या महाविद्यालयात गुंफले जाणार पुष्प

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात जिल्हा प्रशासनाकडून व्याख्यानमालेने ; जिल्ह्यातील मोठ्या महाविद्यालयात गुंफले जाणार पुष्प

           लातूर दि. 16 ( जिमाका ) मराठवाडा मुक्ती संग्रामाचे दि. 17 सप्टेंबर 2022 पासून अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत आहे. युवकांना मराठवाडा मुक्ती संग्रामाची ओळख व्हावी, मागच्या पिढ्याचा या स्वातंत्र्यासाठीचे बलिदान,त्याग, समर्पण कळावे म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या संकल्पनेतून सोमवार दि. 19 सप्टेंबर 2022 पासून 26 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्ह्यात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक महाविद्यालयात व्याख्यानमालेचे एक पुष्प गुंफले जाणार आहे.

          व्याख्यानमालेचे उदघाटन सोमवार दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दयानंद कला महाविद्यालयात येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि ज्येष्ठ लेखक, अभ्यासक प्रा.सोमनाथ रोडे, ज्येष्ठ लेखक,विचारशलाकाचे संपादक प्रा. नागोराव कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

         मंगळवार दि.20 सप्टेंबर रोजी राजर्षी शाहू महाविद्यालयात व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प राज्यशास्त्राचे अभ्यासक, प्रा. भूषण जोरगुलवार यांच्या व्याख्यानाने गुंफले जाईल. तर बुधवार दि. 21 सप्टेंबर रोजी उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे इतिहास अभ्यासक, मराठवाडा मुक्ती संग्रामवर विशेष अभ्यास असलेले भाऊसाहेब उमाटे यांचे व्याख्यान असेल. गुरुवार दि. 22 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे साहित्यिक आणि इतिहास अभ्यासक विवेक सोताडेकर यांचे तर शुक्रवार दि. 23 सप्टेंबर रोजी शिवाजी महाविद्यालय, रेणापूर येथे ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक जयप्रकाश दगडे यांचे व्याख्यान असेल. शनिवार दि. 24 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथे साहित्यिक प्रा.जयद्रथ जाधव  आणि जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

        या व्याख्यानमालेचा समारोप सोमवार दि. 26 सप्टेंबर रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर  येथे होणार असून यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अभ्यासक जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णा महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत देशमुख हे या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफणार आहेत. अशी माहिती उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली.

 

                                                             000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु