अमृत संस्थेमार्फत ८ ते २५ एप्रिल दरम्यान लक्षित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण

अमृत संस्थेमार्फत ८ ते २५ एप्रिल दरम्यान लक्षित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण लातूर, दि. ७ (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी 'अमृत परिवार सर्वेक्षण अभियान' राबविण्यात येत आहे. लातूरसह महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकातील युवक-युवती व उमेदवारांच्या प्रगतीसाठी 'अमृत' कार्यरत आहे. या संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व प्रगत कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन आणि वैयक्तिक व्याज परतावा योजना (उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी) यांसारख्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सध्या अमृतच्या लक्षित गटामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी आणि वैश्य या २५ जातींचा समावेश आहे. सर्वेक्षणाअंती या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणाचे स्वरूप आणि हेतू या अभियानाद्वारे लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि स्थानिक संसाधने व कौशल्यानुसार नवीन योजना तयार करणे, असा दुहेरी हेतू आहे. सर्वेक्षणादरम्यान गोळा केलेल्या माहितीच्या आधारे भविष्यात नवीन मूल्यवर्धित योजना तयार करण्यात येतील. तसेच, नोंदणीकृत संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वेळोवेळी योजनांची माहिती दिली जाणार आहे. ८ ते २५ एप्रिल या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष संपर्क साधणार आहेत. तसेच लक्षित गटातील सामाजिक संस्था, संघटना, मंडळे आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी स्वतःहून आपल्या समाजाची व कुटुंबाची माहिती अमृतच्या जिल्हा किंवा विभागीय व्यवस्थापकांकडे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत गरज भासल्यास सर्वेक्षणाची मुदत वाढवण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या नोंदणी मोहिमेत सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अमृत कार्यालय, मयुरेश्वर अपार्टमेंट, पितृछाया बिल्डिंग, पहिला मजला, सिग्नल कॅम्प, विद्यानगर, लातूर (भ्रमणध्वनी: ७३९१०६५४७०) येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित