विशेष लेख : लेक लाडकी योजना: मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल
मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, त्यांचा सन्मान वाढावा आणि त्यांना शिक्षणाच्या समान
संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने लेक
लाडकी योजना १ एप्रिल २०२३ पासून कार्यान्वित केली आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत
नसून मुलींच्या सक्षमीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा एक भक्कम आधार ठरत आहे. आतापर्यंत
लातूर जिल्ह्यातील १० हजार २६ मुलींना या योजनेचा लाभ मजूर करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीला लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जातो. एका कुटुंबातील पहिल्या दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो. जर एखाद्या कुटुंबाला पहिले अपत्य मुलगा आणि दुसरे मुलगी असेल, तर त्या मुलीला या योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच, दुसऱ्या अपत्याच्या वेळी अर्ज करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
‘लेक लाडकी’ योजना पिवळ्या आणि केशरी
रेशनकार्डधारक कुटुंबांसाठी अत्यंत लाभदायी ठरत आहे. पात्र कुटुंबातील मुलीला
जन्मापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत विविध पाच टप्प्यांत एकूण १ लाख १ हजार
रुपयांचे अर्थसाहाय्य थेट बँक खात्यात दिले जाते. योजनेचे नियोजन अतिशय सूत्रबद्ध
पद्धतीने करण्यात आले आहे: मुलीच्या जन्माचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पहिल्या
टप्प्यात ५ हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेते, तेव्हा ६
हजार रुपयांचे सहाय्य केले जाते. तिने सहावीत प्रवेश घेतल्यावर ७ हजार रुपयांचा
लाभ दिला जातो. मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या शैक्षणिक खर्चासाठी ८ हजार रुपये
दिले जातात आणि मुलीने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तिला ७५ हजार रुपयांचे
अर्थसहाय्य मिळते, ज्यामुळे
तिला पुढील उच्च शिक्षण किंवा करिअरसाठी मोठी मदत होते.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याकरिता
लाभार्थी मुलीचा जन्म दाखला, कुटुंबाच्या
वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याचा दाखला, लाभार्थी व पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुकची
छायांकित प्रत आणि पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. मुलीने
१८ वर्षे पूर्ण केल्यानंतर अंतिम लाभ मिळवण्यासाठी ती अविवाहित असणे आणि तिचे नाव
मतदार यादीत असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका आणि प्रकल्प स्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी
यांच्याशी संपर्क साधता येईल.
संकलन :
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर
*****

Comments
Post a Comment