संभाव्य ‘एल निनो’मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

 


 संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा

·         भूजल पुनर्भरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार

 

लातूर, दि. २२ (जिमाका) : संभाव्य ‘एल निनो’मुळे आगामी मॉन्सून काळात पडणारा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा राहणार असून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यासोबतच आगामी पावसाळ्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या.

जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, निवासी उप जिल्हाधिकारी केशव नेटके, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंग पाटील, रोहित जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषद आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या जलसाठा जपून वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे जलसाठ्यातील पाणी प्राधान्याने पिण्यासाठी वापरण्यावर भर द्यावा. सिंचन प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात. यासोबतच जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठीही पशुसंवर्धन विभागाने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिल्या. पावसाच्या अनिश्चिततेमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आतापासून सज्जता ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाच्या मॉन्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. जिल्हा परिषद, कृषि विभागाने यामध्ये पुढाकार घेवून शेतकऱ्यांना विहीर पुनर्भरण, विंधन विहीर पुनर्भरण यासोबतच जलतारा उपक्रमासाठी प्रोत्साहित करावे. तसेच जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे विभागाने सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी जिल्ह्यातील जलसाठ्यांची सद्यस्थिती व संभाव्य पाणी टंचाई आराखडा याबाबत माहिती दिली. आतापर्यंत जिल्ह्यात १३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत जिल्ह्यात पुरेसा जलसाठा असला तरी काही ठिकाणी पाणी टंचाई उपाययोजना करण्याची आवश्यक भासू शकते. त्यामुळे सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी दर आठवड्याला तालुकास्तरावर पाणी टंचाईचा आढावा घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असे श्री. नेटके म्हणाले.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन