लातूर तालुक्यातील ममदापूर येथे १७ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर
लातूर तालुक्यातील ममदापूर येथे १७ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर
लातूर, दि. १५ : महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता मौजे ममदापूर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर मंगल कार्यालय, ममदापूर पाटी या ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिरला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
या समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारले जाणार असून त्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना विविध सेवा व सुविधा एकाच ठिकाणी पुरविल्या जातील. यामध्ये प्रामुख्याने पंचायत समितीमार्फत घरकुल, जनावरांसाठी गोठा व विहीर योजनांची माहिती दिली जाईल. कृषी विभागाद्वारे ॲग्रीस्टॅक, फार्मर आयडी, पी.एम. विकास योजना, बी-बियाणे व खतांबाबत मार्गदर्शन केले जाईल. भूमी अभिलेख विभागामार्फत 'क' पत्रक, नकाशे व जमीन मोजणी अर्जांचे वाटप होईल, तर आरोग्य विभागाकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करून आयुष्यमान कार्डांचे वितरण केले जाईल.
याव्यतिरिक्त महिला व बाल विकास विभागामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती दिली जाईल. विद्युत वितरण विभाग नवीन रोहित्र कनेक्शन व शेती वीज पुरवठ्याबाबत मार्गदर्शन करेल. तहसील कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी रहिवासी, उत्पन्न, जात व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे यासारखे विविध दाखले दिले जातील. तसेच संजय गांधी निराधार योजना, नवीन रेशन कार्ड वाटप, रेशन कार्ड दुरुस्ती आणि जिवंत सातबारा वाटप यांसारख्या महत्त्वाच्या सेवाही येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार श्री. तांदळे यांनी केले आहे.
***
Comments
Post a Comment