संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सज्ज राहवे; रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण मोहीम हाती घ्यावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सज्ज राहवे; रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण मोहीम हाती घ्यावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर, दि. १७ : आगामी मॉन्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई व मॉन्सूनचे उशिरा आगमन होण्याची शक्यता लक्षात घेवून पाणी पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे. उपलब्ध जलसाठ्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक असून त्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. तसेच मॉन्सून पूर्वी जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण मोहीम हाती घेण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. लातूर जिल्ह्यातील विविध विकास कामे व संभाव्य पाणी टंचाईबाबत पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार यांची या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सद्यस्थितीत पाणी टंचाईची तीव्रता कमी असली तरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तिथे तातडीने उपाययोजना मंजूर करून नागरिकांना पाणी पुरवठा करावा. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सध्या अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, गळती रोखणे यासारख्या कामांना प्राधान्य देवून पाण्याचा अपव्यय टाळावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. लातूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यासाठी आवश्यक प्रयोगशाळा उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाईल, असे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत महावितरणने पाणी पुरवठा योजनांची वीज खंडित करण्याची कार्यवाही करू नये. तांड्यावरील पाणी टंचाई निवारणासाठीही विशेष उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. यासाठी तातडीने सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही हाती घ्यावी. बंधारे, तलावातील गाळ उपसा करण्याची कार्यवाही मोहीम स्वरुपात राबवावी, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले. अपूर्ण पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील चाकूर, चापोली, हाडोळती, किनगाव यासारख्या मोठ्या पाणी पुरवठा योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत, या योजनांच्या कामांना गती द्यावी. तसेच इतरही पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती हाती घेणे गरजेचे आहे. तसेच विद्युत देयके थकीत असल्याने एकही पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना सौरउर्जेवर कार्यान्वित कराव्यात, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. तसेच जिल्ह्यातील पांदन रस्त्यांच्या कामांनाही गती द्यावी, असे ते म्हणाले. लातूर जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ होण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे. यासोबतच जिल्ह्यात काही ठिकाणी ब्रीज कम बंधारे उभारून जलसंधारणाला हातभार लावण्याची आवश्यकता आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण आदी कामे मोहीम स्वरुपात हाती घेवून शेतकरी, नागरिकांना यासाठी प्रोत्साहित करावे, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. तसेच लातूर शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात असे ते म्हणाले. औसा तालुक्यातील भंगेवाडी, महादेववाडीसह इतर ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागल्याने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महादेववाडी येथील पाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच किलारी पाणी पुरवठा योजनेला अनेक ठिकाणी गळती असल्याने पाणी वाया जात आहे. आगामी मॉन्सून कालावधीत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनजागृती करावी, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन