येत्या ८ एप्रिल रोजी 'डिजिटल शेती शाळा' भाग-२; जैविक व नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे मिळणार धडे
येत्या ८ एप्रिल रोजी 'डिजिटल शेती शाळा' भाग-२;
जैविक व नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे मिळणार धडे
लातूर, दि. ६ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता 'डिजिटल शेती शाळा' भाग-२ चे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्राला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, आता दुसऱ्या सत्रामध्ये 'जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. या सत्रात शेतकरी बांधवांना घरच्या घरी बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क यांसारख्या उपयुक्त निविष्ठा तयार करण्याचे प्रगत तंत्रज्ञान शिकायला मिळणार असून, या निविष्ठांचे फायदे आणि वापराबाबतही सखोल माहिती दिली जाणार आहे.
हवामान बदलाला सामोरे जात आपली शेती अधिक शाश्वत आणि समृद्ध करण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही डिजिटल शेती शाळा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि पाणी फाऊंडेशन यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या भागातील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई किंवा कृषी सखी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment