लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन; शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन
लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन;
शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन
लातूर, दि. २० : खरीप २०२६ हंगामात लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदी करताना येणाऱ्या अडचणी व गुणवत्तेबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर १ आणि तालुकास्तरावर १० असे एकूण ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे गुणनियंत्रण निरीक्षक नियमितपणे विक्री केंद्रांची तपासणी करत आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.
खरेदी दरम्यान किंवा हंगाम संपेपर्यंत निविष्ठांच्या दर्जाबाबत संशय आल्यास शेतकरी संबंधित तालुक्याच्या तक्रार निवारण कक्षाकडे धाव घेऊ शकतात. तक्रार करताना शेतकऱ्यांनी लेखी अर्जासोबत खरेदीची पक्की पावती, सातबारा उतारा ही कागदपत्रे जोडणे आवश्यक असून त्यावर स्वतःचा पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. याशिवाय, तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडेही तक्रार नोंदवता येईल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम आणि जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर यांनी शेतकऱ्यांना केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच निविष्ठा खरेदी करण्याचे आणि पावतीवर जात, लॉट नंबर, उत्पादन दिनांक असल्याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या खतांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नसून, चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तक्रार नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी ९४०४६८०४३७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ८७८८०९१४०१ व ७५८८१७८७८७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच dsaolatur@rediffmail.com किंवा adolatur@gmail.com या ई-मेल आयडीवरही आपली तक्रार पाठवता येईल.
*****
Comments
Post a Comment