विशेष लेख : 'उमेद' अभियानातून लातूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच 'उमेद' अभियानाद्वारे लातूर जिल्ह्यामध्ये सन २०१८ पासून ग्रामीण विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. हे अभियान ग्रामीण भागातील गरीब, मागास, दिव्यांग, विधवा आणि अल्पभूधारक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारी चळवळ बनली आहे. महिलांना सक्षम संस्थांच्या माध्यमातून संघटित करून त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास करणे आणि त्यांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मूळ गाभा आहे.
लातूर जिल्ह्याने 'उमेद' अभियानात उल्लेखनीय कामगिर केली असून, आतापर्यंत १ लाख ९४ हजार ८९२ महिलांना २० हजार २५० स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून अभियानाशी जोडण्यात आले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात ९६३ ग्रामसंघ, ५८ प्रभागसंघ आणि १७६ उत्पादक गटांचे एक भक्कम जाळे निर्माण करण्यात आले आहे. यामाध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीचा पाया रचला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'लखपती दीदी' या महत्त्वाकांक्षी अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून, महिलांना व्यवसाय निवडण्यापासून ते उत्पादनांच्या विपणनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण आणि भांडवलाची मदत दिली जात आहे.
लातूर जिल्ह्यातील महिला केवळ पारंपरिक कामांपुरत्या मर्यादित न राहता, आता आधुनिक शेती आणि उद्योगांकडे वळल्या आहेत. 'स्मार्ट' प्रकल्प आणि केंद्र पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपनी निर्मितीच्या माध्यमातून सोयाबीन, तूर आणि हरभरा यांसारख्या पिकांच्या मूल्य साखळीवर आधारित व्यवसाय महिला यशस्वीपणे चालवत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत १२४ कृषी सखी नैसर्गिक शेतीचा प्रसार करत असून सेंद्रिय अन्नधान्य उत्पादनात मोलाचे योगदान देत आहेत. तसेच, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांतर्गत अनेक महिलांनी स्वतःचे उद्योग उभे करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून यशस्वीपणे कर्जपुरवठा मिळवला आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी 'उमेद' अंतर्गत विविध निधींचे वाटप करण्यात आले आहे. फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी आणि जोखीम प्रवणता निधीच्या माध्यमातून गटांना आणि ग्रामसंघांना आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यात आले आहे. सन २०२५-२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध गटांना २१५ कोटी ७५ लाख रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महिला बचतगटांची उत्पादने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
लातूरच्या ग्रामीण महिलांनी तयार केलेली १०३ उत्पादने आता केवळ स्थानिक बाजारातच नव्हे, तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आणि ओ.एन.डी.सी. यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जगभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. लातूरची पारंपरिक गोधडी, शुद्ध मध, लाकडी बैलगाडी आणि दर्जेदार तूरडाळ या उत्पादनांनी ग्राहकांची मने जिंकली आहेत. जिल्ह्यातील उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आगामी दोन-तीन महिन्यांत 'हिरकणी मॉल' कार्यान्वित होत असून, तो वर्षभर ग्राहकांसाठी खुला राहणार आहे. अशा प्रकारे, 'उमेद' अभियानामुळे लातूर जिल्ह्यातील महिला केवळ घर चालवणाऱ्या गृहिणी न राहता, खऱ्या अर्थाने गावच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून उदयास येत आहेत.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

Comments
Post a Comment