महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण लातूर, दि. १० : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU) द्वारे सुरू असलेल्या १७५ पदांच्या भरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांकडून भरती प्रक्रियेबाबत विचारणा होत आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, विद्यापीठाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार ही भरती प्रक्रिया निरंतर सुरू आहे. या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार विद्यापीठाला ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याची अनुमती दिली आहे. न्यायालयाच्या अंतरिम निर्देशानुसार, केवळ १४ याचिकाकर्ते ज्या पदांवर सध्या कार्यरत आहेत, ती पदे वगळून उर्वरित सर्व पदांची भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. या प्रकरणातील तांत्रिक बाबी स्पष्ट करताना विद्यापीठाने नमूद केले की, संबंधित याचिकाकर्ते हे बाह्य कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आलेले मनुष्यबळ असून ते विद्यापीठाचे थेट कर्मचारी नाहीत, ही वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम मनात न ठेवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा. भरतीबाबतची सर्व अद्ययावत माहिती विद्यापीठाच्या www.mafsu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत