उष्णतेच्या लाटेची तीव्रता लक्षात घेवून ‘नीट’ परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

उष्णतेच्या लाटेची तीव्रता लक्षात घेवून ‘नीट’ परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. २८: लातूर जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रांवर आगामी ३ मे २०२६ रोजी नीट युजी २०२६ परीक्षा पार पडणार असून, सुमारे १६ हजार ३०० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सज्जता आणि उपाययोजना ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध पावले उचलली जात आहेत. वाढत्या उष्णतेचा विचार करता प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. या पथकांकडे उष्माघातावरील उपचारासाठी आवश्यक औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, तसेच वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांसाठी सावलीची व्यवस्था आणि दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, शहरात विद्यार्थी आणि पालकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला चोख बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. गतिशील तपासणी प्रक्रिया आणि दंडाधिकारी नियुक्ती परीक्षा केंद्रांवर होणारी विद्यार्थ्यांची तपासणी आणि बायोमेट्रिक हजेरीची प्रक्रिया अधिक गतिशील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना विनाकारण विलंब होणार नाही. सुरक्षेच्या आणि नियोजनाच्या दृष्टीने प्रत्येक केंद्रावर कर्तव्य दंडाधिकारी म्हणून महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, भरारी पथकेही गठीत करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना लातूर जिल्ह्यात ३ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत होणाऱ्या या परीक्षेदरम्यान प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षामध्ये आरोग्य, पोलीस, महावितरण आणि परिवहन विभागाचे अधिकारी २ आणि ३ मे रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत उपस्थित राहतील. नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्षाचा ९३५६४०४९२० हा दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून परीक्षेशी संबंधित अडीअडचणी मांडता येतील. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन