लातूर जिल्ह्यात सीईटी परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्ह्यात सीईटी परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २०: जिल्ह्यात दि. २१ ते २६ एप्रिल, २०२६ या कालावधीत एमबीए, एमएमएस सीईटी आणि एमएचटी सीईटी २०२६ या सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ उपकेंद्रांवर ही परीक्षा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, या काळात केंद्रावर परीक्षार्थींची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. २१ ते २६ एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक ही सर्व माध्यमे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, सेल्युलर फोन किंवा इतर कोणतीही प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल, तसेच कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला किंवा वाहनाला केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. हे निर्बंध परीक्षा कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासनास लागू नसून, परीक्षेचे कामकाज शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन