मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘मॅपिंग’ मोहीम; लातूर तालुक्यातील मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘मॅपिंग’ मोहीम;
लातूर तालुक्यातील मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन
· २५ एप्रिलपासून बीएलओ देत आहेत घरोघरी भेट
· सन २००२ च्या मतदार यादीशी होणार पडताळणी
लातूर, दि. ३० (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अधिक पारदर्शक आणि निर्दोष करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत २००२ च्या मतदार यादीशी सर्व मतदारांचे मॅपिंग (पडताळणी) करणे अनिवार्य असून, लातूर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर २५ एप्रिल २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपलब्ध आहेत.
मॅपिंग प्रक्रियेचे स्वरूप
दुबार आणि तिबार मतदारांचा शोध घेण्यासाठी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही मतदारांची पडताळणी केली जात आहे. मतदारांनी त्यांच्याकडील मतदार ओळखपत्र दाखविल्यानंतर बीएलओ २००२ मधील मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक या आधारावर मॅपिंग करणार आहेत. ज्या मतदारांची नोंद २००२ नंतरची आहे, अशा मतदारांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारावर केली जाईल.
बीएलओंची उपलब्धता
एप्रिल पासून दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत बीएलओ मतदान केंद्रावर उपस्थित राहतील. तसेच इतर वेळी बीएलओ मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. जे मतदार या मॅपिंग प्रक्रियेत सहभाग घेणार नाहीत, त्यांना आगामी 'सखोल पुनरिक्षण' (एसआयआर) मोहिमेवेळी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष सुनावणीला सामोरे जावे लागेल. या सुनावणीत पुराव्यांची तपासणी झाल्यानंतरच मतदार यादीत नाव कायम ठेवले जाईल. ही सुनावणीची प्रक्रिया टाळण्यासाठी मतदारांनी बीएलओंना सहकार्य करून आपले मॅपिंग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नेऱ्हे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment