जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेत जनजागृती

जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेत जनजागृती लातूर, दि. ०२ (जिमाका): जागतिक ऑटिझम दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने गुरुवारी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वमग्नता (ऑटिझम) या विषयावर समाजात व्यापक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना शांती व स्वीकृतीचे प्रतीक असलेली 'निळी रिबीन' बांधून या दिनाचे महत्त्व विषद केले. तसेच ऑटिझम या आजाराबद्दलची सविस्तर माहिती देणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. या जनजागृती मोहिमेत ऑटिझम म्हणजे काय, त्याची मुख्य लक्षणे, सामाजिक व संवादातील अडचणी, पुनरावृत्ती वर्तन, आजाराची कारणे, लवकर ओळख, अचूक निदान आणि उपचार व व्यवस्थापन या विविध तांत्रिक आणि सामाजिक पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. यंदाच्या जागतिक ऑटिझम दिनाची मुख्य थीम “ऑटिझम आणि मानवता - प्रत्येक जीवनाला मूल्य आहे” अशी आहे. ही संकल्पना स्वमग्न व्यक्तींचा सन्मान, त्यांचे हक्क, सामाजिक समावेश आणि त्यांना मिळणाऱ्या समान संधींच्या महत्त्वावर भर देते. त्यांच्यातील अद्वितीय क्षमतांना वाव देणे आणि त्यांना समाजाचा अविभाज्य घटक मानणे, हा या थीमचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानवता, मूल्य, सर्वसमावेशकता आणि जागरूकता या चतुःसूत्रीवर आधारित हे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बस्वराज पैके यांच्यासह समाजकार्य विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन