डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता १० मे पूर्वी करण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या
प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता १० मे पूर्वी करण्याचे आवाहन
लातूर, दि. २८ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी २०१७ पासून राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत २६ डिसेंबर २०२६ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या असून, या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत लातूर कार्यालयाच्या लॉगिनवरून ६८१ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर (सेंट बॅक) पाठविण्यात आले आहेत.
या संदर्भात संबंधित विद्यार्थ्यांना वेळोवेळी दूरध्वनीद्वारे संदेश पाठवून व थेट संपर्क साधून त्रुटी दूर करण्याबाबत सूचित करण्यात आले असून, २८ एप्रिल २०२६ रोजी देखील पुन्हा एकदा संदेश पाठवण्यात आला आहे. हे अर्ज विद्यार्थ्यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याने त्यावर कार्यालयीन स्तरावरून कार्यवाही करणे शक्य नाही, त्यामुळे या अर्जांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज 'सेंट बॅक' करण्यात आले आहेत, त्यांनी स्वतःच्या लॉगिनवर जाऊन आवश्यक त्या त्रुटींची पूर्तता करावी आणि आपले ऑनलाईन अर्ज १० मे २०२६ पूर्वी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन लातूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
****
Comments
Post a Comment