विलासराव देशमुख शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयात मेंदूतील अॅन्युरिझमवर यशस्वी शस्त्रक्रिया; ७० वर्षीय महिलेला मिळाले नवजीवन

विलासराव देशमुख शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयात मेंदूतील अॅन्युरिझमवर यशस्वी शस्त्रक्रिया; ७० वर्षीय महिलेला मिळाले नवजीवन लातूर, दिनांक ६ (जिमाका): लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी मेंदूतील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या 'अॅन्युरिझम' या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून एका ७० वर्षीय महिला रुग्णाचे प्राण वाचविले आहेत. या यशस्वी उपचारामुळे शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक न्युरोसर्जरी सुविधा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संबंधित रुग्ण महिला डोकेदुखी, उलट्या आणि अचानक शुद्ध हरपणे अशा गंभीर तक्रारींसह रुग्णालयात दाखल झाली होती. तातडीने करण्यात आलेल्या सिटी स्कॅन व एंजिओग्राफी तपासणीत रुग्णाच्या मेंदूतील 'अँटेरियर कम्युनिकेटिंग आर्टरी'मध्ये अॅन्युरिझम फुटल्याचे निदान झाले. अॅन्युरिझम म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्या कमकुवत होऊन तयार झालेला फुगवटा. हा फुगवटा फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होऊन मृत्यूचा मोठा धोका असतो. रुग्णाची गंभीर प्रकृती पाहता न्युरोसर्जरी विभागाने तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितीन बर्डे व त्यांच्या तज्ज्ञ पथकाने 'अॅन्युरिझम क्लिपिंग' ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया पार पाडली. या प्रक्रियेत फुगलेली रक्तवाहिनी सुरक्षितपणे क्लिप करून रक्तस्राव थांबविण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर आयसीयूमध्ये न्युरोसर्जरी आणि बधिरीकरणशास्त्र विभागाच्या समन्वयाने रुग्णाची विशेष काळजी घेण्यात आली. ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात विशेष कार्य अधिकारी डॉ. सुनील होळीकर, न्युरोसर्जरी विभागप्रमुख डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. नितीन बर्डे, डॉ. शीतल अग्रोया, डॉ. संगिता कदम, डॉ. कृष्णमूर्ती कोकणकर, डॉ. निखिला सुभाषिनी, डॉ. वैजनाथ फड, डॉ. बुमेश्वरी तसेच बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. विनायक शिरसाठ, विभागप्रमुख डॉ. संगिता आगळे, डॉ. संतोष चिंचकर, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. साईनाथ कुंटे, डॉ. आरती काचेकर व डॉ. सेल्वामूर्ती यांच्या पथकाचा समावेश होता. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. उमेश कानडे, डॉ. मंगेश सेलुकर, डॉ. अजय ओव्हाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड आणि डॉ. महादेव बनसुडे यांची उपस्थिती होती. मोफत उपचारांचे आवाहन या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. लातूरमध्येच अशा उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने आता गंभीर रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी झाली आहे. गरजू रुग्णांनी अशा शस्त्रक्रियांचा लाभ महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित