लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
·
रुग्णालय
इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही
लातूर, दि. १८ : लातूरकरांचे
गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न मूर्त स्वरूपात येत असून काही तांत्रिक कारणांमुळे
प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज १०० खाटांच्या
रुग्णालयाचे भूमिपूजन होत असले तरी याठिकाणी ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय
उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह पुरेसा निधी उपलब्ध करून
दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिली.
लातूर शहरातील नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय
परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन
पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार
मंत्री बाबासाहेब पाटील होते. यावेळी विधानपरिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद विक्रम
काळे, लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष
उषाताई पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, महापौर जयश्री सोनकांबळे,
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद
सुरवसे, महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगीता पतंगे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी
व नागरिकांची उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर
लातूरला येण्यापूर्वीच जिल्हा रुग्णालयाचा विषय माझ्यापर्यंत आला होता. यासाठी येथील
लोकप्रतिनिधी व माझं लातूर परिवाराने सातत्यपूर्ण आग्रही मागणी मांडली. मंत्रिमंडळ
बैठकीमध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित
पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी
सकारात्मक पावले उचलली. सर्वांच्या प्रयत्नातून रूग्णालयाच्या जागेचा विषय मार्गी लागला.
आता रुग्णालय इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असून इमारतीचे काम दर्जेदार
आणि गुणवत्तापूर्ण होईल, याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी. या कामामध्ये कोणत्याही
प्रकारची कुचराई होता कामा नये. इमारतीचे काम विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी
सातत्याने आढावा घेण्यात येईल. या रुग्णालयाच्या माध्यमातून लातूरकरांना अद्ययावत
आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी
म्हणाले.
जिल्हा रुग्णालयाचा विषय मार्गी
लागल्यामुळे आपल्याला आनंद झाला असून या रुग्णालयाच्या रूपाने आपल्या कामाची आठवण कायमस्वरूपी राहील, असे पालकमंत्री श्री.
भोसले म्हणाले. तसेच लातूर ते कल्याण द्रुतगती महामार्गाची घोषणा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे लातूर ते कल्याण हे अंतर पाच तासात
गाठता येईल, हा महामार्ग लातूर जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यासोबतच लातूर येथे जुन्या सर्किट हाऊसच्या जागेवर नवे सुसज्ज सर्किट हाऊसची
उभारणी केली जाईल, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत
निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
*जिल्हा रुग्णालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील :
सहकारमंत्री बाबसाहेब पाटील*
अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेल्या जिल्हा
रुग्णालयाचे भूमिपूजन आज होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित
पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे रुग्णालयाच्या
जागेसाठी निधी उपलब्ध झाला. महामार्गाच्या लगतची जागा जिल्हा रुग्णालयाला मिळाली
असून याठिकाणी मिळणाऱ्या आरोग्य सुविधा दर्जेदार असाव्यात. ही इमारत आरोग्य मंदिर
असून इमारतीचे बांधकाम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने कोविडच्या
कठीण काळात समाजाची चांगली सेवा केली, त्याचप्रमाणे यापुढेही रुग्णांना चांगल्या
आरोग्य सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे सहकारमंत्री बाबासाहेब
पाटील यावेळी म्हणाले.
बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आरोग्याचे
प्रश्न निर्माण होत असून त्यांना चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जिल्हा
रुग्णालयाची गरज होती. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला जिल्हा
रुग्णालयाचा विषय मार्गी लागल्याने जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा
मिळण्यास मदत होईल, असे विधानपरिषदेचे आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे म्हणाले.
लातूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहावा, असा आजचा दिवस आहे. लातूरकरांची गेल्या अनेक
वर्षांपासून मागणी असलेल्या जिल्हा रुग्णालयाची मागणी आता पूर्ण होत आहे. या
रुग्णालयाचे काम दर्जेदार व्हावे. तसेच लातूरच्या
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ,
यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आमदार संजय
बनसोडे म्हणाले.
लातूर जिल्हा रुग्णालयाला कृषी
महाविद्यालयाची जागा देण्यामध्ये तत्कालीन कृषिमंत्री स्वर्गीय पांडुरंग फुंडकर
यांचे महत्वाचे योगदान आहे. कृषि महाविद्यालयाची जागा रुग्णालयाला अपवादात्मक बाब
म्हणून मंजुरी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासोबतच जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न
सोडविण्यामध्ये पत्रकार, माझं
लातूर परिवाराचा मोठा वाटा आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर उभा राहत असलेले जिल्हा
रुग्णालय ५०० खाटांचे करावे. यासाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध
करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले. यासोबतच लातूर
शहरातील वाहतूक कोंडी, जुन्या सर्किट हाऊसच्या जागी नवीन सर्किट हाउस उभारणीचा
मुद्दाही त्यांनी मांडला.
जिल्हा रुग्णालयाचे काम कालबद्ध स्वरुपात
पूर्ण होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल. तसेच या रुग्णालयाची क्षमता १००
वरून ५०० खाटांची करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक प्रस्ताव पाठविण्याची
कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी
सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
प्रदीप ढेले यांनी केले. त्यानंतर प्रस्तावित रुग्णालय इमारतीच्या आराखड्याची
माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. प्रारंभी पालकमंत्री श्री. भोसले, सहकारमंत्री
श्री. पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून आणि कोनशीला अनावरण करून जिल्हा रुग्णालय
इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
****
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment