लातूर जिल्हा परिषदेत सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर
लातूर जिल्हा परिषदेत सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ;
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर
लातूर, दि. ०९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने 'सामाजिक समता सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी या सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ८ ते १४ एप्रिल या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या विशेष सप्ताहाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा प्रसार आणि महापुरुषांच्या समतेच्या विचारांचा जागर संपूर्ण जिल्ह्यात केला जाणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी लातूर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार विजेते बालाजी धोंडीराम पवार यांचा सत्कार करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, दिव्यांग शाळा आणि शासकीय वसतिगृहांमध्ये मानवी हक्कांवर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार असून, सर्व शाळांनी यात सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे.
या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक मोहन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी शिवाजी शिरडे, लेखाधिकारी अनिल हगवाने, समाज कल्याण निरीक्षक राहुल काळे, विक्रम जाधव, डॉ. राजू गायकवाड यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment