लातूर जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत सामाजिक समता सप्ताह; विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहीम
लातूर जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत सामाजिक समता सप्ताह;
विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहीम
लातूर, दि. १३: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर कार्यालयामार्फत १ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील तसेच सन २०२६-२७ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे संकलित केली जाणार आहेत. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तालुका व महाविद्यालयनिहाय संख्यात्मक माहिती 'समान संधी केंद्राच्या' माध्यमातून महाविद्यालय तसेच जिल्हा स्तरावर गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सामाजिक समता सप्ताहादरम्यान सीईटी (CET) देणारे विद्यार्थी आणि डिप्लोमा तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यावर भर दिला जाणार आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत विशेष 'वेबिनार'चे आयोजनही करण्यात येणार आहे.
समान संधी केंद्रांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांवर जात पडताळणी समितीच्या वतीने तात्काळ कार्यवाही करून विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्रे दिली जातील. जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील व सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करून या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य बलभीम शिंदे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment