'मधुमित्र' व 'मधुसखी' पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; २० मे रोजी पुण्यात होणार गौरव
'मधुमित्र' व 'मधुसखी' पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन;
२० मे रोजी पुण्यात होणार गौरव
लातूर, दि. २७ (जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ सालासाठी 'मधुमित्र' आणि 'मधुसखी' पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व या क्षेत्रातील मधपाळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून मंडळाने हा उपक्रम सुरू केला असून, यात मधमाशीपालनात दीर्घकाळ यशस्वीपणे काम करणाऱ्या मधपाळांचा सन्मान केला जातो. या पुरस्कार योजनेत प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये आणि तृतीय ५ हजार रुपये अशा स्वरूपाचे तीन पुरस्कार दिले जाणार असून, यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. या पुरस्कारांचे अर्ज प्रत्येक जिल्ह्याच्या खादी मंडळाच्या कार्यालयात किंवा मंडळाच्या www.mskvib.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. २० मे २०२६ रोजी 'जागतिक मधमाशी दिना'च्या औचित्याने पुणे येथे एका भव्य समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. याविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय, लातूर ( दूरध्वनी क्रमांक ०२३८२-२२०१४४) किंवा मध संचालनालय, महाबळेश्वर (दूरध्वनी क्रमांक ०२१६८-२६०२६४) या क्रमांकावर संपर्क साधता येईल. जास्तीत जास्त मधपाळांनी या पुरस्कारासाठी आपली नामांकने पाठवावीत, असे आवाहन मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील व जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.****
Comments
Post a Comment