लातूर जिल्ह्यात कृषी अवजार बँक स्थापनेसाठी नोंदणीकृत संस्थांकडून २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
लातूर जिल्ह्यात कृषी अवजार बँक स्थापनेसाठी
नोंदणीकृत संस्थांकडून २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. २५: ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (व्ही.एस.टी.एफ.) आणि सर दोराबाजी टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त भागीदारीतून, तसेच लातूर जिल्हा कृषी विभाग यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील आकांक्षित व शेतकरी आत्महत्याप्रवण भागात ग्रामीण उपजीविका बळकट करण्यासाठी कृषी अवजार बँकांची स्थापना करण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत औसा तालुक्यातील किल्लारी, लामजना, चलबुर्गा, अशिव, कवळी, जवळगा पोमादेवी, मंगरूळ, दापेगाव, बानेगाव, उत्का, पारधेवाडी; जळकोट तालुक्यातील चेरा, हावरगा, होकरना, शेलदरा, उमरदरा, उमारगा रेतु, येलदरा; तसेच अहमदपूर तालुक्यातील मावलगाव, अंधोरी, हगदळ, रुद्दा, सुनेगाव सेंद्री, धसवाडी, लेंदेगाव, नांदूराखुर्द, सोरा, तळेगाव आणि येस्तार या निवडक गावांमध्ये एकूण ३ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभाग, आत्मा, उमेद (एमएसआरएलएम), माविम किंवा इतर शासकीय विभागांकडे नोंदणीकृत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी/एफपीओ), शेतकरी गट, बचतगटांचे ग्रामसंघ (व्हीओ), प्रभाग संघ (सीएलएफ) आणि समुदाय आधारित संसाधन संस्थांकडून (सीएमआरसी) प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. संस्था निवडीमध्ये मिशन महाग्राम व एक हजार गाव विकास कार्यक्रमांतर्गत समाविष्ट गावांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, तर लगतच्या गावांमध्ये कार्यरत संस्था व 'स्मार्ट' प्रकल्पांतर्गत अनुदानित संस्थांना द्वितीय आणि तालुका स्तरावरील संस्थांना तृतीय प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच सन २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्याने निवड प्रक्रियेत किमान एका महिला संचलित समुदाय आधारित संस्थेस विशेष प्राधान्य दिले जाईल.
या उपक्रमासाठी अर्जाचा नमुना व सविस्तर मार्गदर्शक सूचना २४ ऑगस्ट २०२६ पासून औसा, अहमदपूर व जळकोट येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात, तसेच व्ही.एस.टी.एफ. च्या www.mvstf.org या संकेतस्थळावर आणि लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पात्र संस्थांनी आपले अर्ज ३१ ऑगस्ट २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करायचे आहेत. या योजनेत कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करण्याचे किंवा ती रद्द करण्याचे सर्व अधिकार व्ही.एस.टी.एफ. कडे राखीव असून अधिक माहितीसाठी औसा (९८३४३७०८३४), अहमदपूर (९५६१९६१९१६), जळकोट (९१८५२२४०१२) येथील व्ही.एस.टी.एफ. समन्वयक व संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment