समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
लातूर, दि. ३१ : समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एका छताखाली उपलब्ध होत असून यामुळे सर्वसामान्य जनतेचे वेळेची बचत व आर्थिक बचत असल्याचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. अहमदपूर येथे संत सावतामाळी मंगल कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे होत्या.
लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, लातूर जिल्हा परिषद सभापती उत्तम माने, अहमदपूरच्या तहसीलदार उज्वला पांगारकर, चाकूरचे तहसिलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, अहमदपूर पंचायत समिती सभापती सुरज पाटील, अहमदपूरच्या उपसभापती अयोध्या केंद्रे, चाकूरचे उपसभापती चाकूर भुजंगराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे, प्रतीक्षा गुट्टे, अश्विन नागराळे, रंजना चाटे, उषाताई सोनकांबळे, भानुदास पोटे, अहमदपूरचे उपनगराध्यक्ष अय्याज शेख, प्रदीप खोमणे, नगरपंचायत चाकूर नगराध्यक्ष भागवत फुले, भागवत गुट्टे, पंचायत समिती सदस्य सुधीर गुट्टे, रविंद्र बोडके, गजानन होनराव, संतोष कलवले, तानाजी राजे, मधुकर मुंढे आदी उपस्थित होते.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा माहिती व लाभ सुलभ पद्धतीने मिळत आहे. शासन व प्रशासनाच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आगामी काळातही विविध लोकाभिमुख योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले.
राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. कर्जमुक्तीच्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी केले. यामध्ये त्यांनी महसूल विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवांची माहिती दिली. तसेच सध्या सुरु असलेल्या एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात महसूल विभागासह विविध विभागातील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिलीप देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी अविनाश पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागासह अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. यावेळी विविध स्टॉल उभारण्यात आले होते. या सर्व स्टॉलची पाहणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व इतर सर्व अधिकाऱ्यांनी केली. या समाधान शिबिरास अहमदपूर व चाकूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.
****
Comments
Post a Comment