राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी
२१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. २० (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता विविध योजनांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.
समान निधी योजनेअंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असून, इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने दिला जात असल्याने त्याकरिता स्वतंत्र प्रस्ताव पाठवू नयेत. असमान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री व फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये तर इमारत बांधकामासाठी १० ते १५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. याशिवाय ज्ञान कोपरा विकासासाठी २.५० लाख रुपये, आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपये, महोत्सवी वर्षे (५०, ६०, ७५, १००, १२५, १५० वर्षे) साजरी करण्यासाठी ६.२० लाख रुपये आणि इमारत विस्तारासाठी १० लाख रुपयांची तरतूद आहे. तसेच राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण व जागरूकता कार्यक्रमांसाठी १.५० लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत आणि बाल ग्रंथालय व बालकोपरा स्थापनेसाठी ६.८० लाख रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
या योजनांचे नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुकांनी कोणत्याही एकाच योजनेसाठीचा प्रस्ताव इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतीत तयार करून, आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावा किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधवा.
****
Comments
Post a Comment