लातूरच्या ५ शेतकऱ्यांना मिळणार परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लातूरच्या ५ शेतकऱ्यांना मिळणार परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन लातूर, दि. ३० (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांमधील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती व्हावी, तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी आणि कृषीमाल प्रक्रिया यांबाबत अद्ययावत ज्ञान अवगत करता यावे यासाठी कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे योजना सन २०२६-२७ राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत परदेशातील शेती तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा वापर राज्यातील शेतकरी स्वतःच्या शेतीमध्ये करू शकतील, तसेच संबंधित देशांतील शेतकऱ्यांशी थेट चर्चा, क्षेत्रीय भेटी व विविध कृषी संस्थांना भेटी देऊन शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी मार्गदर्शक सूचनेनुसार चालू वर्षात युरोप आणि चीन या देशांची निवड करण्यात आली असून लातूर जिल्ह्यासाठी एकूण ५ शेतकऱ्यांचे भौतिक लक्षांक प्राप्त झाले आहे. प्राप्त लक्षांकानुसार १ महिला शेतकरी, १ केंद्र किंवा राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीक स्पर्धा विजेते शेतकरी आणि ३ इतर शेतकरी अशा वर्गवारीतून निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २ लाख रुपये (यांपैकी जी रक्कम कमी असेल ती) अनुदान दिले जाणार आहे. या दौऱ्यासाठी पात्र शेतकऱ्यांची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत केली जाणार असून, लातूर जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी येत्या १० ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास