महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारासाठी पात्र उद्योग, निर्यातदार, व्यापारी संस्था व सेवा निर्यातदारांनी अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारासाठी पात्र उद्योग,
निर्यातदार, व्यापारी संस्था व सेवा निर्यातदारांनी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ योजनेंतर्गत सन 2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार या पुरस्कारांचा उद्देश महाराष्ट्रातील उत्कृष्ट निर्यातदारांना रोख पारितोषिक व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन त्यांच्या निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणे हा आहे.
राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाने सन 2024-2025 व 2025-2026 या वर्षांसाठी राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगातील उत्पादक निर्यातदार, व्यापारी निर्यातदार, सेवा निर्यातदार, महिला, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उत्पादन निर्यातदार, ओडीओपी तथा जीआय निर्यातदार तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांतील पात्र निर्यातदारांकडून अर्ज मागविले आहेत. यावर्षी विविध क्षेत्रातील एकूण 66 पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यामध्ये सुवर्ण व रौप्य पुरस्कारांचा समावेश आहे.
अर्जासंबंधी पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना उद्योग संचालनालयाच्या http://di.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज उद्योग संचालनालयाकडे 01 ऑगस्ट 2026 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र निर्यातदारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट क्र. पी-5, एमआयडीसी, लातूर येथे सादर करावेत. लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र उद्योग, निर्यातदार, व्यापारी संस्था व सेवा निर्यातदारांनी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी मोठ्या संख्येने अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर येथील जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment