पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: लातूर जिल्ह्यातील ५४,४२६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन


लातूर, दि. २५: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ४२६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. सर्व पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 'ॲग्रीस्टॅक'वर नोंदणी करून 'आधार प्रमाणीकरण' प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यात २२ जुलै रोजी जाहीर झालेल्या यादीत लातूर जिल्ह्यातील २ गावांमधील १३३ पात्र शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ८९२ गावांमधील ५४ हजार २९३ पात्र शेतकऱ्यांची यादी शेतकरी सभासदांच्या विशिष्ट क्रमांकासहित जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५ हजार २३१, तर राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे १९ हजार १९५ अशा एकूण ५४ हजार ४२६ पात्र कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवल्या जाणार आहेत. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँकांच्या शाखांमध्येही लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आला आहे. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असून, जिल्ह्यातील सुमारे ८८८ आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकरी बांधवांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक, यादीत नावापुढे नमूद असलेला विशिष्ट क्रमांक आणि 'ॲग्रीस्टॅक' नोंदणी या आवश्यक कागदपत्रांसह आपली आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यावी. ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात 'डीबीटी' प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास