लातूर येथे २७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर

लातूर येथे २७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर • महसूल सेवा, आरोग्य शिबीर, विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी लातूर, दि. २३ : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभरात २२ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी लातूर येथील पार्वती मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा 'एक खिडकी प्रणाली'द्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार असून, यामध्ये सातबारा व फेरफार दुरुस्ती, डिजिटल सातबारा सेवा, विविध प्रकारची दाखले व प्रमाणपत्रे वितरण, महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, फार्मर आयडी, महिलांचे नाव अधिकार अभिलेखात समाविष्ट करणे, पात्र निवासी अतिक्रमणे नियमितीकरण, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनांबाबत मार्गदर्शन, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, शिधापत्रिका वितरण तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ व मार्गदर्शन प्रत्यक्ष उपलब्ध करून दिले जाईल. महसूल सेवांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी मोफत सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत डोळ्यांची तपासणी, मधुमेह (शुगर), उच्च रक्तदाब, महिलांचे आरोग्य, हाडांचे आजार, कर्करोगाबाबत प्राथमिक तपासणी व मार्गदर्शन, रक्त तपासणी तसेच आवश्यक आरोग्यविषयक सल्ला मोफत दिला जाणार आहे. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शिबिरात हरितोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध प्रकारच्या फळझाडांची व उपयुक्त वृक्षांची रोपे नागरिकांना उपलब्ध करून देऊन वृक्षलागवडीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकल्याण योजनांची माहिती व लाभ आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एस.टी. महामंडळ) सवलत योजना व प्रवासी कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. या शिबिरात विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करतील. तरी लातूर शहर मतदारसंघातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी लातूर, श्रीमती रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे. **

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास