अहमदपूर येथे ३१ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
अहमदपूर येथे ३१ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
लातूर, दि. ३० : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात २२ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहमदपूर येथील सावता माळी मंगल कार्यालय येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड हे राहतील.
यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाजकल्याण सभापती उत्तम माने, जिल्हा परिषद सदस्य ॲड. अजिंक्य देशमुख, इंजि. प्रफुलचंद्र गुंडरे, शितल खोमणे, अश्विन नागराळे, रंजना चाटे, प्रतीक्षा गुट्टे, भानुदास पोटे, अमर पाटील, उषा सोनकांबळे तसेच अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, चाकूर पंचायत समितीच्या सभापती जयश्री नागरगोजे, अहमदपूरचे नगराध्यक्ष स्वप्नील व्हत्ते आणि चाकूरचे नगराध्यक्ष भागवत फुले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.
या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे लाभ, दाखले आणि महसूल विभागाशी संबंधित सेवा नागरिकांना पुरवल्या जाणार आहेत. तरी अहमदपूर व चाकुर तालुक्यातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी या समाधान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर आणि चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांनी केले आहे.
***
Comments
Post a Comment