भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत, ज्यामध्ये मुलांची १४ आणि मुलींची १२ वसतिगृहे समाविष्ट आहेत. यापैकी लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे असून औसा, निलंगा, उदगीर, देवणी आणि चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १ वसतिगृह सुरू आहे. तसेच अहमदपूर येथे मुलांची २ व मुलींची २, रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व शासकीय वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून, इच्छुक विद्यार्थी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या नवीन लिंकचा वापर करून आपले अर्ज भरू शकतात. जिल्ह्यात इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर-व्यावसायिक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) हे प्रवेश अर्ज भरता येतील. तसेच अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या (मधल्या) वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थीही या प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन व बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता २२ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना जागेअभावी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तर अशा पात्र विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा (निवास व भोजन भत्ता) ऑनलाईन पद्धतीने लाभ दिला जातो. वसतिगृह प्रवेशासाठी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज परस्पर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन वर्ग केले जात असल्याने, ज्या विद्यार्थ्यांनी मूळ वसतिगृह प्रवेशाचा अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा स्वतंत्र अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन प्रणालीत कोणतीही सुविधा उपलब्ध असणार नाही आणि त्यांना या योजनेचा लाभही मिळणार नाही. तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वरील नवीन वेबलिंकचा वापर करून आणि स्थानिक गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याशी संपर्क साधून आपले प्रवेश अर्ज वेळेत भरावेत, असे आवाहन लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास