लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
लातूर, दि. १७ : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि आगामी काळात मुदत संपणाऱ्या एकूण ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी कळविले आहे.
या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करताना १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरण्यात यावी, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत. या कार्यक्रमानुसार शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांना आपल्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी शुक्रवार, २४ जुलै २०२६ ते बुधवार, २९ जुलै २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सर्व हरकती व सूचनांचा योग्य विचार करून मंगळवार, ०४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नागरिकांनी व इच्छुकांनी विहित मुदतीत मतदार यादीची पडताळणी करून घ्यावी आणि आवश्यक असल्यास आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
**
Comments
Post a Comment