महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०२६ ची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी; लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती
महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०२६ ची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी; लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती
लातूर, दि. २३ : राज्य शासनाच्या गृह (परिवहन) विभागाद्वारे १६ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) (पहिली सुधारणा) नियम, २०२६ राज्यभरात लागू करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात या नवीन नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
नवीन नियमावलीनुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्कूल बसचे किमान भाडेदर आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (आरटीए) निश्चित केले जाणार असून प्रत्यक्ष दर हे निश्चित दरापेक्षा १० टक्के कमी किंवा जास्त राहू शकतील. तसेच शाळांमधील शालेय परिवहन समितीने दर तिमाहीला पालक व वाहतूकदारांची बैठक घेऊन त्याचा अहवाल जिल्हा स्कूल बस समितीस सादर करणे बंधनकारक आहे. स्कूल बसमधील चालक, महिला सहवर्ती व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक शाळा व्यवस्थापन किंवा वाहनधारकाकडून लेखी पत्राद्वारे केली जाईल, आणि त्यांची नियुक्तीपूर्वी चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय तपासणी करून त्याचे सर्व अभिलेख जतन करून ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दरदिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रक ठेवणे आवश्यक असून पूर्व प्राथमिक व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अधिक कडक सुरक्षा नियम लागू राहतील. वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसमध्ये व्हीकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आणि अग्निरोधक यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शालेय वाहनांची कमाल वयोमर्यादा १५ वर्षांवरून वाढवून २० वर्षे करण्यात आली आहे. डिजिटल सुरक्षेचा भाग म्हणून वाहनांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य केले असून किमान ३० दिवसांचे फुटेज जतन करून ते आवश्यकतेनुसार मोबाईल ॲपद्वारे पालक व संबंधित विभागास उपलब्ध करून दिले जाईल. या सर्व नियमांची चाचपणी करण्यासाठी परिवहन व शिक्षण विभागाद्वारे नियमित संयुक्त तपासणी केली जाईल. ही अधिसूचना १६ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झाली असून सर्व शाळा व वाहनधारकांना या तरतुदींची पूर्तता करण्यासाठी ३ महिन्यांची कालमर्यादा देण्यात आली आहे.
**
Comments
Post a Comment