युजीसी नेट परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
सुधारित
युजीसी नेट परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
लातूर, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर १७ व १८ जुलै, २०२६ या कालावधीत सीएसआयआर युजीसी नेट परीक्षा जून, २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, ही परीक्षा सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ अशा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी लातूरचे जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय अन्य पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित प्रवेश करण्यास तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास व शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, दुकाने, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बुथ आणि ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली असून, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला किंवा वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. हे प्रतिबंधात्मक आदेश १७ व १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील. परीक्षा उपकेंद्रावर कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी, निगराणी अधिकारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या शासकीय कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने या आदेशातून वगळण्यात आले आहे.
***
Comments
Post a Comment