‘ वीज ’ दुर्घटना; टाळू या... काय करावे, काय करु नये !
लेख :- दि. 6 जून 2022
‘ वीज ’ दुर्घटना; टाळू या...
काय करावे, काय करु नये !
जागतिक बँकेच्या
अहवालानुसार भारत दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे जीडीपीच्या सरासरी 2.25 टक्के इतकी
संपत्ती गमावतो. भारतात वीज पडून मृत्यू झालेल्यांची संख्या इतर नैसर्गिक
आपत्तींपेक्षा सर्वात जास्त आहे. भारतात दरवर्षी सरासरी 2 हजार 400 लोकांचा वीज
पडून मृत्यू होतो. भारतातील अपघाती मृत्यू सर्वेक्षणानुसार वीज पडून होणाऱ्या
मृत्यमध्ये मध्यप्रदेशानंतर महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आहे. वीज पडून
मृत्य होण्यात महाराष्ट्रात मराठवाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. लातूर जिल्ह्यात
2006-2021 या कालावधीत 138 लोकांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. वीजच्या
दृष्टीकोनातून हा एक “हॉटस्पॉट” आहे. लातूर जिल्ह्यात मृत्यू लातूर तालुक्यात असून
त्यापाठोपाठ निलंगा आणि अहमदपूरचा क्रमांक लागतो आणि सर्वात कमी मृत्यू रेणापूर
आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यात झाले आहेत.
आकाशातील
विजेसंदर्भातील कांही महत्वाचे पैलू आणि आकडेवारी
वीजा पावळ्यापूर्वी
जास्त पडतात म्हणजे एप्रिल ते जूनच्या काळात. तसेच विजा पडण्याचे प्रमाण दुपारनंतर
जास्त असते. वीज पडून मृत्यमुखी पडण्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषामध्ये
जास्त आहे. भारतात विजेमुळे मृत्यमुखी पडलेल्यामध्ये 71.48 टक्के पुरुष तर 28.51
टक्के स्त्रिया होत्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर पण अशाच प्रकारचे प्रमाण दिसून
येते. भारतात मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त वय वर्षे 30-44 ( 34.23 टक्के) या
वयोगटात आहे. त्यापाठोपाठ 15-29 वर्षे ( 28.8 टक्के) आणि 45-59 (21.51 टक्के)
वयोगटात आहे. वीज प्रभावित व्यक्तीस त्वरीत प्रथमोपचार दिल्यास त्याचे प्राण
वाचवता येतात, जागतिक वीज प्रभावीत व्यक्ती मृत्यमुखी पडण्याचे प्रमाण फक्त 10 ते
30 टक्के आहे. विजेचा आघात झालेल्या ठिकाणांचा अभ्यास केला असता, असे लक्षात येते
की , सर्वात जास्त हे खुल्या मैदानात 27 टक्के नतंर झाडाखाली 16 टक्के व पाण्याजवळ
13 टक्के आहे. साधारणत: 56 टक्के वेळेस व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी डोंगर किंवा
एखाद्या उंच वस्तूजवळ असतांना घडल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील
काही आकडेवारी
सर्व मृत व्यक्ती
ग्रामीण भागातील आहेत. 60 टक्के मृत्यू एप्रिल आणि जून महिन्यात झाले आहेत. तसेच
जेंव्हा दोन पावसामधील अंतर जास्त होते, तेंव्हा वीज पडून मृत्यू झालेले आहेत.
सर्व घटना दुपारी 2-00 नंतर झालेल्या आहेत. सर्वात जास्त मृत्यू खुल्या मैदानात,
त्यांनतर झाडाखाली व पाण्याजवळ झाले आहेत. मृतांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचे
प्रमाण खुप जास्त आहे. 60 टक्के मृत व्यक्ती 30 ते 60
वयोगटातील आहेत. अंदाजे 80 टक्के मृत व्यक्ती उभे होते व त्यांच्या हातात धूतची वस्तू
होती. दुचाकी वाहन चालवताना विजेच्या धक्क्याने दोन मृत्यू झाले आहेत. चारचाकी
वाहन चालवताना मृत्यू झालेला नाही. बंद खिडक्या असलेली चारचाकी वाहन विजेपासून
सुरक्षित आहे. गोठा, दारे आणि खिडक्या नसलेल्या जुन्या शाळेच्या इमारतीसारख्या
तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये मृत्यू झाल्याचे आढळून आहे. त्यामुळे बंदिस्त
निवारा विजेपासून बचावासाठी सुरक्षित स्थान आहे. विजेपासून वाचलेली व्यक्ती
बसलेल्या अवस्थेत होते व त्यांनी कळत-नकळत विजरोधक गोष्टी जसे लाकडू, प्लास्टिक
यांचा पायाखाली वापर केला होता.
आकाशात विजा चमकत
असतांना गोष्टी कराव्यात
शेतात काम करित
असतांना जवळील पक्क्या व बंदिस्त घराचा त्वरीत आसरा घ्यावा. आसरा घेतल्यानंतर
पायाखाली कोरडे लाकूड , प्लास्टिक, गोणपाट कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय
एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा. पायाव्यतिरिक्त शरिराचा कुठलाही
भाग जमिनीला स्पर्श होणार नाही यांची काळजी घ्यावी. ओल्या शेतात अथवा तलावात काम
करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छिमारी
करणारे यांनी त्वरीत पाण्यातून बाहेर यावे. झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट
अंतरावर उभे रहावे. एखादे उंच झाड ( जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे
असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्यांची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत
खोलवर गाडून ठेवावे. पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या
घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी. आपले घर, शेत इत्यांदीच्या जवळपास कमी उंचीची झाडे
लावावीत. जंगलात असाल, तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. वृक्ष,
दलदलीच्या ठिकाणी तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा. मोकळ्या आकाशाखाली
असण्यापेक्षा एखाद्या छोट्या झाडाखाली आसरा घ्यावा, असे शक्य नसल्यास जमिनीपासून
खालील खोलगट ठिकाणी आधी सांगितलेल्या ( क्र. 1) पध्दतींनी गुडघ्यात वाकून बसा. जर
आधीच खोलगट भागात असाल, तर वरती येवू नका. चारचाकी वाहनातून प्रवास करित असल्यास
खिडक्या बंद करुन आतच बसावे. विजा जास्त करुन दुपारनंतर पडत असल्यामुळे निवाऱ्यापासून
लांबच कामे सकाळी करावी व दुपारनंतर निवाऱ्यापासून जवळची कामे
करावे. जेणेकरुन पाऊस आलयास त्वरित आसरा घेता येईल.
आकाशात विजा चमकत
असतांना या गोष्टी टाळा ...
खुल्या मैदानात उभे
राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात. झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी,
झाडावर चढू नका. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर, विजेच्या उच्च दाबाच्या तारा
इत्यादीजवळ उभे राहू नका. गाव, शेत, आवर, बाग आणि घर यांच्या भोवती तारेचे कुंपन
घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका
यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करुन
नका. वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.
एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान पंधरा (15)
फुट अंतर राहील याची काळजी घ्या. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नका.
विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र इत्यादीपासून
दूर रहा. पाण्याचा नळ, फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका, शिवाय त्यापासून दूर
रहा. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करु नका, मोबाईलचा
वापर टाळा.
आकाशात विजा चमकत
असतांना जीव वाचविणारा नियम ...
विजेचा प्रकाश आणि
आवाज यात 30 सेंकद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल, तर तुम्ही वादळाच्या आवाक्यात
आहात, तुम्हाला विजेपासून धोका आहे, तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ही 80 टक्के
आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे, अशावेळेस सुरक्षित जागेचा
आसरा घ्या. शेवटचा गडगडाट एकेल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे.
दामिनी ॲप- विजेची
पूर्वसूचना
भारत सरकारने
विजेच्या पूर्व सुचनेसाठी दामिनी नावाचे मोफत ॲप सुरु केलेले आहे. या ॲपद्वारे वीज
पडण्याची पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते. सदरील ॲप वीज पडण्याची शक्यता दर्शविते.
हे ॲप गुगल प्ले स्टोरवरुन मोफत डाऊनलोड करता येते. ॲप सुरु केल्यानंतर जर
मोबाईलच्या स्क्रीनवर लाल रंगात चेतावणी दिसल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा व
बाहेर जाणे टाळावे.
या लेखत देण्यात
आलेल्या उपाययोजना विज आणि त्यापासून सुरक्षितता या संशोधन अभ्यास प्रकल्पाअंती
आलेल्या निष्कर्षावरुन देण्यात आलेल्या आहेत. सदरील संशोधन प्रकल्प जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण लातूर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
उपकेंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ उपकेंद्राती व्यवस्थापन
शास्त्र संकुल प्राध्यापक डॉ. प्रमोद हनुमंराव पाटील - येथील मुख्य संशोधक आणि
सहसंशोधक सहसंशोधक प्राध्यापक डॉ. राजेश शिंदे, संचालक उपकेंद्र लातूर यांनी
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करुन पूर्ण केला आहे.
n जिल्हा माहिती
कार्यालय,
लातूर
0000
Comments
Post a Comment