सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ · ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ · ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर लातूर, दि. २७ : राज्यात अत्यंत उत्साहाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मागील वर्षापासून राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. या महोत्सवांतर्गत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार यावर्षीपासून देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच देशभरात आणि जगभरात अत्यंत उत्साहाने व विविध विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनादेखील यावर्षीपासून या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र तीन पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. या राज्य महोत्सवांतर्गत आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर स्वीकारले जाणार आहेत. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, पर्यावरणपूरक उत्सव आणि सामाजिक संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके जिंकण्याची संधी घ्यावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत