भूकंप पूर्वतयारीत युवकांची भूमिका या विषयी राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
भूकंप पूर्वतयारीत युवकांची भूमिका या विषयी राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
लातूर दि.14 ( जिमाका ) ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक आपत्ती धोके निवारण दिन
म्हणून साजरा करण्यात येते. लातूर जिल्ह्यातील हासोरी ता. निलंगा येथे मागील काही दिवसात
भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने व जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
जिल्हाधिकारी कार्यालय लातूर आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्स स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठ नांदेड उप-परिसर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन
कार्यशाळा भूकंप पूर्वतयारीत युवकांची भूमिका या विषयावर दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 रोजी
आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज यांनी लातूर जिल्ह्यात
होत असलेल्या भूकंपाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सदरची कार्यशाळा उपयुक्त ठरेल अशी
अपेक्षा व्यक्त केली. कोणतीही मोठी आपत्ती घडल्यानंतर परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी
युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद केले. आपत्ती व्यवस्थापनामध्ये
युवक एक महत्त्वाचा घटक असल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यशाळेचे अध्यक्ष
कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सर यांनी विद्यापीठ कशा पद्धतीने विविध आपत्तीच्या व्यवस्थापनाकरिता
वेगवेगळे उपक्रम राबवीत असल्याचे नमूद करून
विद्यापीठाच्या परिसरात कोविड निदान चाचणी प्रयोगशाळा व जलसंवर्धन उपक्रमाचा
यावेळी विशेष उल्लेख केला. विद्यापीठ उप-परिसर लातूरचे संचालक डॉ. राजेश शिंदे यांनी
उपकेंद्राच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चालू असलेल्या विविध अभ्यासक्रमाविषयी
माहिती दिली तसेच या विभागाद्वारे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली
उद्घाटन समारंभाचे समारोप डॉ. प्रमोद पाटील यांनी केले.
या राष्ट्रीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात श्री. रविकांत सिंग वरिष्ठ शास्त्रज्ञ
राष्ट्रीय भूकंप शास्त्र विभाग नवी दिल्ली यांनी भूकंपाविषयी शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण
करून लातूर व परिसरातील लहान-मोठे भूकंपाच्या नोंदी भूकंपमापक यंत्रात अचूकपणे नोंद
कशा पद्धतीने होतात याची माहिती दिली. तसेच मान्सून पश्चात भूगर्भात हालचाली होतात
व कालांतराने नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत याचे प्रमाण कमी होत जाते असे नमूद केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात कॉन्फिडरेशन ऑफ रिस्क रिडक्शन प्रोफेशनल इंडिया या संस्थेची
सदस्य श्री. तन्मय गोंड यांनी युवकाची भूकंपापूर्वी, दरम्यान व नंतर असलेल्या भूमिके
विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका
श्री गणेश बेल्लाळे यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा व मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन
कार्यप्रणाली या षयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी साकेब उस्मानी यांनी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानकडून
करण्यात येत असलेल्या विविध पूर्वतयारी विषयी सादरीकरण केले. शेवटी कार्यशाळेचे संयोजक
डॉक्टर प्रमोद पाटील यांनी सर्व मान्यवरांचे व कार्यशाळेमध्ये सहभागी सर्व युवकांचे
विद्यार्थ्यांचे आभार मानले. सदर कार्यशाळेत देशभरातून जवळपास 600 पेक्षा जास्त पदव्युत्तर
विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यशाळेचे लाईव्ह प्रसारण यूट्यूब द्वारे आणि जिल्हाधिकारी
यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून करण्यात आले. या कार्यशालेच सूत्र संचालन डॉ. प्रमोद
पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. मेघा साळुंके, प्रा. प्रियांका
निटुरकर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक आयटी श्री. प्रवीण पोंडे, श्रीराम वाघमारे यांनी
परिश्रम घेतले.
****
Comments
Post a Comment